रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जेनिलियाच्या कंपनीवर भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचाराचे आरोप केले

गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (08:52 IST)
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जेनिलिया डिसोझाच्या कंपनीवर भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. रितेश आणि जेनेलिया यांच्या देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसंदर्भात हा आरोप करण्यात आला आहे. या कंपनीला देशमुख कुटुंबाचं वर्चस्व असणाऱ्या बँकांकडून तातडीने कर्ज कसं मिळालं? अगदी महिन्याभराच्या कालावधीमध्ये एमआयडीसीमध्ये या कंपनीला जमीन कशी मंजूर करण्यात आली? १६ उद्योजकांना टाळून रितेश आणि जेनेलियाच्या कंपनीला प्राधान्य का देण्यात आलं? असे प्रश्न भाजपाने उपस्थित केले आहेत.
 
५ एप्रिल २०२१ ला जागेसाठी अर्ज केल्यानंतर १५ एप्रिलला भूखंड मंजूर करण्यात आला. अवघ्या १० दिवसांमध्ये भूखंड मंजुरी देण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे. लातूरमध्ये भाजपाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे आरोप केले. २२ जुलै २०२१ रोजी जागेचा ताबा कंपनीला देण्यात आला. या कंपनीने पंढरपूर कोऑपरेटिव्ह बँकेत ४ ऑक्टोबर २०२१ रोजी कर्जासाठी अर्ज केला. त्यानंतर लगेच तीन आठवड्यांमध्ये म्हणजे २७ ऑक्टोबरला कर्ज मंजूर करण्यात आले. कंपनीकडे केवळ ७.५ कोटींचं भागभांडवल असताना कंपनीने १५ कोटी रुपये भूखंडासाठी भरल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती