मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राम यादव आणि रेखा यादव यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यादव दाम्पत्याने भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांच्यावर राजकीय कोंडी करत असल्याचा आरोप केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राम यादव यांनी शिंदे गटात प्रवेश करणे, हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राम यादव यांच्या प्रवेशाने शिंदे गटाला उत्तर भारतीय समाजाला आकर्षित करणारा एक नेता मिळाल्याची चर्चा आहे. ठाण्यानंतर मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना रुजवण्यात एकनाथ शिंदे यांना मदत होईल, असा दावा केला जात आहे. मात्र, या कृतीमुळे भाजप आणि शिंदे गटाच्या कुरबुरी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राम यादव आणि रेखा यादव यांनी शिंदे गटात प्रवेश करतानाच्या कार्यक्रमात भाजपच्या स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे अनेक गंभीर आरोप केले आहेत. आमची सर्व नेत्यांवर नाराजी आहे. आम्ही महिला नेत्याच्या कार्यालयात जायचो तेव्हा त्यांनी आम्हाला बसून दिले जात नसे. आम्हाला त्यांची भेटही मिळत नव्हती, असे रेखा यादव यांनी म्हटले.