अंधेरी पोटनिवडणूक- भाजपने माघार का घेतली? कारण? यामील थोडे विश्लेषण

सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (22:08 IST)
मुंबई – शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराने माघार घेतली आहे. या निवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. आज दुपारी भाजपने या निवडणुकीतून माघारीची घोषणा केली आहे. आता ऋतुजा बिनविरोध विजयी होईल, असे मानले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. पण, भाजपने उमेदवारी मागे का घेतली याची आता चर्चा सुरू झाली आहे.
 
अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली तेव्हा ती मुंबई महापालिका निवडणुकीची सेमीफायनल मानली गेली. या पोटनिवडणुकीच्या निकालाचा संदेश मुंबई महापालिकेपर्यंत जाईल, असे बोलले जात आहे. त्यामुळे ही लढत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.
 
अंधेरी पूर्व विधानसभेसाठीची लढत खूपच रंजक असणार होती. उद्धव गटाच्या उमेदवार या मराठी तर गुजराती असलेल्या मुरजी पटेल यांना भाजप-शिंदे गटाने उमेदवारी दिली. ही निवडणूक गुजराती विरुद्ध मराठी अशी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. कारण या जागेवर हिंदी आणि मराठी भाषिक मतदारांचे वर्चस्व आहे. काही मोजक्याच भागात गुजराती लोकसंख्या आहे. रमेश लटके यांनाही मराठी मतदार एकदिलाने मतदान करत होते. २०१४ च्या मोदी लाटेतही ते या जागेवरून विजयी झाले होते. एवढेच नाही तर या निवडणुकीत उद्धव यांच्या उमेदवाराच्या बाजूने सहानुभूतीच्या मतांची लाट येण्याची दाट शक्यता होती.
 
या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचा पराभव झाला असता, तर आगामी मुंबई महापालिका निवडणूक कठीण होऊ शकली असती. ५० हून अधिक आमदार आणि १२ खासदारांसह संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बंडाचा सामना केल्यानंतर उद्धव ठाकरे कमजोर दिसत आहेत. अशा स्थितीत ठाकरे गटाच्या उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या असत्या तर ठाकरे गटाने ही लढाई जिंकली असती. तसेच, त्यांच्या छावणीला खुपच प्रोत्साहन मिळाले असते. हाच उत्साह ठाकरे गटाला मुंबई महापालिका निवडणुकीत महत्त्वाचा ठरला असता. ही बाब हेरुनच भाजपने उमेदवार मागे घेतल्याचे बोलले जात आहे.
 
उद्धव ठाकरेंचे चुलत बंधू राज ठाकरे हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. मात्र, राज ठाकरे यांनी रविवारी पत्र भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला.शिवाय भाजपनेही माघार घ्यावी, अशी विनंती केली.  आता याच विनंतीला मान देऊन भाजपने उमेदवार मागे घेतला आहे. मात्र, सूत्रांचे म्हणणे आहे की, भाजप आणि राज ठाकरे यांची अंतर्गत हातमिळवणी आहे. राज यांनी पत्र लिहावे असे भाजपनेच सूचित केल्याचेही बोलले जात आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती