शरद पवारांवर होणार आहे ती एन्डोस्कोपी म्हणजे काय? ती कशी केली जाते?
मंगळवार, 30 मार्च 2021 (18:58 IST)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना सोमवारी तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. पवारांवर मुंबईच्या ब्रीचकॅंडी रुग्णालयात उपचार होणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्या माहितीनुसार, शरद पवारांना पित्ताशयाची समस्या आहे. त्याच्या उपचारासाठी शरद पवार बुधवारी (31 मार्चला) रुग्णालयात दाखल होतील. त्यांची एन्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल शरद पवारांची 'एन्डोस्कोपी' होणार म्हणजे काय केलं जाणार? ही कशी केली जाते? याचा फायदा काय? तज्ज्ञांकडून आम्ही सोप्या शब्दात 'एन्डोस्कोपी' म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
'एन्डोस्कोपी' म्हणजे काय?
रुग्णालयात डॉक्टरांकडून 'एन्डोस्कोपी' हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल. लोकांना 'एन्डोस्कोपी' हा शब्द हळूहळू परिचित होऊ लागलाय.
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, 'एन्डोस्कोपी' म्हणजे दुर्बिणीच्या मदतीने करण्यात आलेली वैद्यकीय तपासणी. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, Endos- म्हणजे आतील आणि scopy- म्हणजे पाहणे.
शरीराच्या आतील अवयवांना पाहणं आणि त्यांची तपासणी म्हणजे 'एन्डोस्कोपी'. काही वर्षांपूर्वी डॉक्टरांना शरीराच्या आतील अवयवांना पाहणं शक्य नव्हतं. मात्र, 'एन्डोस्कोपी' म्हणजे दुर्बिणीच्या सहाय्याने डॉक्टर शरीराच्या आतील अवयव पाहू शकतात. जे डोळ्यांना दिसून नाहीत.
'एन्डोस्कोपी' कशी केली जाते?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 'एन्डोस्कोपी' मध्ये एक लवचिक रबरी नळी तोंडावाटे, गुदद्वाराच्या मार्गाने किंवा एक शरीरावर छोटं छिद्रकरून आत घातली जाते. या नळीच्या टोकाला छोटा कॅमेरा आणि लाईट असतो. या नळीच्या मदतीने डॉक्टर आतपर्यंत पोहोचतात आणि कॅमेरामुळे शरीराच्या आतील डोळ्यांनी न दिसणारे अवयव त्यांना तपासायला मिळतात.
डॉक्टर शरीराच्या आतील अवयवांचे फोटो काढू शकतात. जेणेकरून आजारावर योग्य उपचार केले जाऊ शकतात.
सर जे.जे. रुग्णालयाचे इंटरव्हेन्शनल रेडियोलॉजिस्ट डॉ. शिवराज इंगोले सांगतात, "एन्डोस्कोपीत पोटावर एक छोटं छिद्र करून त्यातून एन्डोस्कोप (लवचिक रबरी नळी) शरीरात टाकला जातो. कार्बन डाय ऑक्साईडच्या मदतीने पोट फुगवलं जातं. जेणेकरून एकमेकांना चिकटलेले पोटातील अवयव दूर होतील आणि डॉक्टरांना योग्य त्या अवयवापर्यंत पोहोचून तपासणी करता येईल."
'एन्डोस्कोपी' शस्त्रक्रिया नसून आजाराचं योग्य निदान करण्यासाठी वापरली जाणारी तपासणीची पद्धत आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हल्ली काही आजारांवरील शस्त्रक्रिया एन्डोस्कोपीच्या माध्यमातूनही करण्यात येतात.
कशी असते एन्डोस्कोपी प्रक्रिया?
जठराची एन्डोस्कोपी करताना,
घसा बधीर करणारा स्पे मारून घसा बधीर केला जातो.
एन्डोस्कोपीची लवचिक नळी तोंडातून आत घालण्यात येते.
श्वास घेण्यात अडचण येत नाही.
10-15 मिनिटांमध्ये संपूर्ण तपासणी होते.
एन्डोस्कोपीनंतर काहीवेळ घसा दुखतो किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं.
केव्हा करावी लागते 'एन्डोस्कोपी'?
तज्त्रांच्या माहितीनुसार, काहीवेळा सोनोग्राफी, सिटीस्कॅन आणि एमआरआय करूनही आजाराचं योग्य निदान होऊ शकत नाही. अशावेळी एन्डोस्कोपी केल्याने डॉक्टर शरीराच्या आतपर्यंत शिरून आजाराचं योग्य निदान करू शकतात.
एन्डोस्कोपीच्या वापराबाबत माहिती देताना डॉ. अविनाश सूपे सांगतात,
विशिष्ट आजाराचं निदान करण्यासाठी
उपचारांसाठी
शस्त्रक्रियेसाठी (Endoscopic किंवा Laparoscopic शस्त्रक्रियेसाठी)
'एन्डोस्कोपी' चे प्रकार कोणते?
खारच्या हिंदुजा रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि मुंबईतील पालिका रुग्णालयांचे माजी प्रमुख डॉ. अविनाश सुपे सांगतात, "एन्डोस्कोपीच्या मदतीने आजाराचं निदान केलं जातं आणि शस्त्रक्रियादेखील करण्यात येते. त्यामुळे निदान आणि उपचार दोन्हीमध्ये एन्डोस्कोपीचा वापर केला जातो."
जठराची 'एन्डोस्कोपी'
तोंडातून नळी घालून अन्ननलिका, जठर आणि लहान आतड्याच्या सुरूवातीचा भाग तपासता येतो. ज्या रुग्णांना अपचन, एॅसिडीटी, गॅसेस किंवा रक्ताच्या उलट्या होत असल्यास एन्डोस्कोपीने आजाराचं योग्य निदान करणं शक्य होतं.
कोलोनोस्कोपी
गुदद्वारातून एन्डोस्कोप (लवचिक रबरी नळी) आत घालून मोठ्या आतड्याची तपासणी करता येते. आतड्याला असलेला त्रास, आजार याचं निदान शक्य होतं.
दुर्बिणीद्वारे चिकित्सा ((Therapeutic Endoscopy)
अन्ननलिकेत अडकलेला माशाचा काटा, नाणं दुर्बिणीच्या मदतीने काढता येतं
शरीरातील मांसाचा वाढलेला गोळा दुर्बिणीने काढता येतो
अन्ननलिका, जठर, मोठं आतडं यात रक्तस्राव होत असेल तर थांबवता येतो
अन्नमार्ग किंवा लघवीच्या मार्गातील अरूंद झालेला भाग रुंद करण्यासाठी दुर्बिणीचा वापर
एन्डोस्कोपीक रिट्रोग्रेड कोलॅंजिओ पॅंक्रिऑटोग्राफीत पित्ताशयाची नलिका आणि स्वादुपिंडाच्या आजारांची तपासणी आणि निदान करण्यात येतं. पित्तनलिकेमध्ये अडकलेले खडे काढण्यासाठी, स्वादुपिंडातील अडथळा दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो.
बेरिअॅट्रीक सर्जन डॉ. अपर्णा गोविल-भास्कर म्हणतात, "पित्ताशयातील खडे जेव्हा बाहेर पडून बाईल डक्टमध्ये जातात. तेव्हा या खड्यांना काढण्यासाठी एन्डोस्कोपीचा वापर केला जातो."
दुर्बिणीद्वारे नवीन उपचार पद्धती
कॅप्सूल एन्डोस्कोपी
कॅप्सूलमध्ये छोटा कॅमेरा असतो. ही वायरलेस कॅप्सूल अन्नमार्गात जाऊन आठ तासाला हजारो फोटो पाठवते. शरीरावर स्पेशल अँटिना पॅडमार्फत फोटो रेकॉर्ड केले जातात. लहान आतड्यातील रोग, रक्तस्राव यांच निदान होतं.
एन्डोस्कोपिक अल्ट्रासाउंड
एस्डोस्कोपच्या टोकाला अल्ट्रासाउंड प्रोब बसवलेला असतो. स्वादुपिंड, बाईल डक्ट, पित्ताशय, जठर, लहान आतड्यांच्या सुरूवातीचा भाग याच्या आजारांचं निदान होतं.
कोणत्या आजारांचं निदान करण्यासाठी केली जाते एन्डोस्कोपी?
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या आजारांमध्ये एन्डोस्कोपी केली जाते.
पोटविकार
नाक-कान-घशाचे आजार
कार्डिओ व्हॅस्कुरल आजाराचं निदान-उपचार
स्त्रीयांशी संबंधित आजारांमध्ये
युरिनरी टॅक्ट इन्फेक्शन
"लठ्ठपणा कमी करण्यासाठी बेरिअॅट्रीक सर्जरी केली जाते. या सर्जरी आधी पोटाचे आजार आहेत का नाही हे शोधण्यासाठी एन्डोस्कोपीचा वापर केला जातो. तर, शस्त्रक्रियेनंतर काही त्रास होतोय का नाही हे पाहण्यासाठी एन्डोस्कोपीचा फायदेशीर ठरते," असं डॉ. अपर्णा पुढे सांगतात.
'एन्डोस्कोपी' चे फायदे?
'एन्डोस्कोपी' चे फायदे सांगताना डॉ शिवराज इंगोले म्हणतात,
पोटाची चिरफाड होत नसल्याने शरीरातील इतर अवयवांना इजा होण्याची शक्यता कमी
शरीरावर किंवा पोटावर जखमेचे डाग रहात नाहीत
रुग्णांला हॉस्पिटलमध्ये कमी दिवस रहावं लागतं. लवकर डिस्चार्ज मिळतो
एन्डोस्कोपीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया केल्याने जखम लहान असल्याने वेदना कमी होतात
रुग्ण आपल्या दैनंदिन कामाला लवकर सुरूवात करू शकतो
त्यामुळे 'एन्डोस्कोपी' चे अनेक फायदे आहेत.
'एन्डोस्कोपी'पूर्वीची तयारी?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एन्डोस्कोपी करण्याआधी डॉक्टरांकडून रुग्णांना संपूर्ण माहिती दिली जाते.
तपासापूर्वी सहा तास काही खाऊ नये
रुग्ण कोणत्या औषधांवर आहेत हे पाहून त्याप्रमाणे त्याची औषध समायोजित करून घ्यावीत
उच्चरक्तदाब, मधुमेह व इतर काही आजार आहेत का हे जाणून घ्यावं