IPL 2021: आयपीएल वेळापत्रक एका क्लिकवर, पहिली मॅच 9 एप्रिलला

मंगळवार, 30 मार्च 2021 (18:27 IST)
बहुचर्चित इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा चौदावा हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. यंदा ही स्पर्धा भारतात होणार आहे.मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता इथे मॅचेस रंगणार आहेत.
9 एप्रिलला चेन्नईत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील लढतीने हंगामाची सुरुवात होणार आहे.
अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये प्लेऑफ्स आणि फायनल रंगणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारत-इंग्लंड डे नाईट टेस्ट या मैदानावर खेळवण्यात आली होती.
लीग स्टेजमध्ये प्रत्येक संघ चार ठिकाणी सामने खेळणार आहे. 56 लीग मॅचेसपैकी चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू इथे प्रत्येकी दहा मॅच खेळवण्यात येतील. अहमदाबाद आणि दिल्ली इथे प्रत्येकी आठ मॅच होतील.
यंदाच्या हंगामाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या मॅचेस तटस्थ अर्थात न्यूट्रल ठिकाणी खेळवण्यात येतील. कोणताही संघ घरच्या मैदानावर खेळणार नाही.
11 डबल हेडर्स म्हणजे एकाच दिवशी दोन सामने असतील. दुपारचे सामने साडेतीन वाजता सुरू होतील तर रात्रीचे सामने साडेसात वाजता सुरू होतील.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, स्पर्धेचं वेळापत्रक आखण्यात आलं आहे. खेळाडू बायोबबलमध्येच राहतील. प्रत्येक संघ स्पर्धेदरम्यान तीनवेळा प्रवास करणार आहे.
कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन, सुरुवातीचे सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. परिस्थिती सुधारल्यास, प्रेक्षकांना मॅचेस मैदानात पाहण्याची मुभा मिळू शकते. यासंदर्भात नंतर निर्णय घेतला जाईल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती