म्यानमारमधील 'या' लोकांना ‘फॉलन स्टार’ का म्हटलं जातंय?

मंगळवार, 30 मार्च 2021 (17:22 IST)
म्यानमारमध्ये शनिवारी (27 मार्च) लष्करानं केलेल्या कारवाईत लहान मुलांसह 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर केवळ म्यानमारच नाही, तर जगभरातून दुःख व्यक्त करण्यात आलं. हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे नातेवाईक गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या आठवणीमध्ये शोकसभांचं आयोजन करत आहेत.
सुरक्षा दलाकडून काही लोकांना आंदोलनादरम्यान मारण्यात आलं, तर काही जणांची त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली.
1 फेब्रुवारी 2021 रोजी म्यानमारमध्ये लष्करानं उठाव करत सत्ता हस्तगत केली. त्यानंतर लष्कराचा विरोध करण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनकर्त्यांविरोधात केलेल्या कारवाई जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना 'फॉलन स्टार्स' (तुटलेले तारे) संबोधण्यात येत आहे.
लष्कराच्या कारवाईत प्राण गमवावे लागलेल्यांमध्ये 40 वर्षांच्या अई को यांचाही समावेश होता.
 
चार मुलांचे वडील असलेले अई को हे मंडालेचे रहिवासी होते. नारळापासून बनवलेले खाद्यपदार्थ आणि राइस जेली ड्रिंक्स विकून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत होते.
 
सैनिकांनी या भागातल्या छापेमारीदरम्यान त्यांना गोळी मारण्यात आली, असं काही बातम्यांमध्ये म्हटलं होतं. या गोळीबारादरम्यान ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना ओढत आणलं आणि पेटलेल्या टायर्सच्या ढिगाऱ्यावर टाकण्यात आलं. कारच्या टायर्सचा हा ढिगारा आंदोलनकर्त्यांना अडविण्यासाठी बॅरिकेड्स म्हणून वापरण्यात आला होता.
तिथल्या एका रहिवाशानं म्यानमार नाऊ या न्यूज वेबसाइटला सांगितलं, "तो ओरडत होता. माझी मदत करा अशी हाक मारत होता."
त्यांच्या कुटुंबीयांनी रविवारी (28 मार्च) त्याच्या आठवणीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी बोलताना एका नातेवाईकाने अई को यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाचं खूप नुकसान झाल्याचं म्हटलं. एएफपीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की, अई को त्याच्या कुटुंबातला एकमेव कमावता सदस्य होता.
 
'तो माझा एकुलता एक मुलगा होता'
दुसरीकडे मंडालेमध्ये दुसऱ्या एका ठिकाणी लोक 18 वर्षांच्या आंग जिन फियोच्या मृत्यूचा शोक व्यक्त करत होते.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, फियो 'लिन लट्ट फुटसल' क्लबचा गोलकीपर होता. त्याचा स्वभावही अतिशय परोपकारी होता. कोरोना संसर्गाच्या काळात त्यानं स्वयंसेवक म्हणून एका इंटेन्सिव्ह केअर सेंटरमध्ये लोकांची मदत केली होती
त्याच्या कुटुंबीयांनी पत्रकारांना सांगितलं की, शनिवारी झालेल्या आंदोलनादरम्यान तो अगदी पहिल्या रांगेत उभा होता आणि त्याला गोळी लागली.
मुलाच्या शवपेटीशेजारी रडत उभी असलेली त्याची आई म्हणत होती, ''तो माझा एकुलता एक मुलगा होता. आता मलाही मरू दे, म्हणजे मी पण त्याच्याकडे जाऊ शकेन."
 
मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश
11 वर्षांच्या अई मियात थू हिला शवपेटीत ठेवण्यात आलं. तिच्या शवपेटीत काही खेळणी, फुलं आणि हॅलो किटीचं एक चित्रही ठेवलं गेलं. माध्यमांमधील वृत्तानुसार अग्नेय भागातील मावलामइन शहरातील आंदोलकांवर केलेल्या कारवाईदरम्यान या मुलीला गोळी मारण्यात आली.
दुसरीकडे मध्य म्यानमारमधील मिकटीला शहरामध्ये मारल्या गेलेल्या 14 वर्षांच्या पान ई फियूच्या आईने बीबीसी बर्मीजशी बोलताना म्हटलं की, मी जेव्हा आमच्या गल्लीमध्ये लष्कराला घुसताना पाहिलं, तेव्हा सर्व दरवाजे बंद करायला सुरूवात केली. पण मी पूर्णपणे असं करू शकले नाही.
त्या सांगत होत्या, " मी तिला कोसळताना पाहिलं. सुरूवातीला मला वाटलं की ती घसरून पडत आहे. पण नंतर तिच्या छातीतून रक्त वाहताना दिसलं."
अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार म्यानमारमधील सर्वांत मोठ्या शहरात, यंगूनमध्ये 13 वर्षांच्या साई वाई यानला बाहेर खेळत असतानाच गोळी मारण्यात आली. रविवारी त्याच्या शवपेटीशेजारी बसलेले त्याचे कुटुंबीय अतिशय शोकाकुल झाले होते. त्याची आई रडत रडत म्हणत होती, "मी तुझ्याशिवाय कशी जगू बाळा?"
 
'माझा मुलगा शहीद झालाय'
यंगूनमध्येही लोकांनी सांगितलं की 19 वर्षांच्या हति सान वान फी चा मृत्यूही आंदोलनादरम्यान गोळी लागल्यामुळे झाला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार शेजाऱ्यांनी सांगितलं की, तो खूपच हसतमुख मुलगा होता.
त्याच्या आई-वडिलांनी त्यांच्या मित्रांना तसंच कुटुंबीयांनी न रडण्याचं आवाहन केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, "माझा मुलगा शहीद झाला आहे."
म्यानमारमध्ये रविवारीही हिंसाचार सुरूच होता.
माध्यमांमधील वृत्तानुसार 37 वर्षांच्या एका महिला हक्क कार्यकर्त्या मा आ खू यांची काले शहरात गोळी घालून हत्या करण्यात आली. त्या विमेन फॉर जस्टिस या संस्थेच्याही संस्थापक होत्या. द विमेन लीग ऑफ बर्मानं त्यांना अतिशय समर्पित आणि आशावादी महिला म्हणून संबोधलं होतं.
संस्थेनं म्हटलं, "आम्ही त्यांचं धाडस, त्यांचं समर्पण आणि काळजीला सलाम करतो."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती