संजय राऊत : 'मी ठामपणे सांगतो, अमित शहा-शरद पवार यांची भेट झालेली नाही'

सोमवार, 29 मार्च 2021 (16:52 IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या अहमदाबाद येथे झालेल्या कथित बैठकीवरून उलटसुलट वक्तव्यं समोर येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात अहमदाबाद येथे गुप्त बैठक झाल्याची बातमी दैनिक दिव्य भास्करने प्रकाशित केली होती.
 
मात्र, अशी काही भेट झाल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाकारलं आहे.
 
"मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजिबात झालेली नाही. आता तरी रहस्यकथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही," असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
 
दुसरीकडे, अशा प्रकारच्या भेटी होतच असतात, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे.
 
"अशाप्रकारच्या भेटी होतच असतात. यात नवीन काही नाही. अमित शाहांच्या वक्तव्यावरून भेट झाली असावी असे वाटते. शरद पवार आणि अमित शाह यांची भेट खूप निवांत झाली. ही भेट का झाली याबद्दल मी देखील अनभिज्ञ आहे," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीसोबत जाणार का? या प्रश्नावर चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे की, "पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा जो निर्णय घेतील तो मान्य असेल. वरिष्ठ याबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल".
 
ते पुढे म्हणाले, "मला कुठले संकेत मिळालेले नाहीत. ते एवढ्या रात्री पवारांची का भेट घेतली माहिती नाही. आम्हाला अशा काही सूचना वरिष्ठांकडून आल्या की त्या मानायच्या असतात. त्यामुळे अमित शाह आणि अध्यक्षांची भूमिका मान्य असेल, असं ते म्हणाले. अशा भेटी होत असतात. महाराष्ट्रात या कमी झाल्या. अशाप्रकारचे भेट राजकीय आहे असं म्हणता येत नाही. पण दोघे तिकडे होते. अर्थात याबाबत अधिकृत माहिती मात्र नाही. अशा गोष्टी जाहीरपणे सांगायच्या नसतात."
 
दरम्यान, सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगण्यासाठी नसतात, असं सूचक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं. अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर त्यांच्यात भेट झाल्याची चर्चा होती.
 
दरम्यान, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.
 
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे.
राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळते आहे. याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली. परमबीर सिंह या माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुखांवर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
 
महाविकास आघााडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांना साथीला घेत सरकार स्थापन केले होतं. मात्र अपेक्षित संख्याबळ सिद्ध करता न आल्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं होतं.
 
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्यात भेट झालेली आहे. पवारांनी मोदी यांना बारामती इथे कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. दिल्लीत या दोघांची भेट झाली आहे. मात्र शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाल्याचं पहिल्यांदाच चर्चेत येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती