हिमंत बिस्व सरमा : 'ईशान्य भारताचे अमित शहा' आसामचे मुख्यमंत्री होणार का?

शुक्रवार, 26 मार्च 2021 (19:38 IST)
दिलीप कुमार शर्मा
29 मार्च 2014 रोजी आसामच्या तेजपूरमधल्या पंच माइल इथे आयोजित एका प्रचारसभेत हिमंत बिस्व सरमा यांनी भाषण देताना म्हटलं, "तुम्ही (नरेंद्र मोदी) म्हणाला होता की, गुजरातमधल्या पाण्याच्या पाईपलाईनमधून मारुती कार धावू शकते. तुम्ही आसामच्या जनतेला खरंखरं सांगा, आसाममधल्या पाण्याच्या पाईपमधून पाणी वाहतं. गुजरातमध्ये पाण्याच्या पाईपलाईनमधून मुस्लिमांचं रक्त वाहतं."
त्यावेळचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविषयी हिमंत बिस्व सरमा यांनी हे उद्गार काढले होते. त्यावेळी ते आसाम प्रदेश काँग्रेसमधले दिग्गज नेते आणि मंत्री होते.
सरमा यांच्या या वक्तव्यामुळे भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते नाराज झाले आणि दिल्लीत सरकार बदललं तर हिमंत बिस्व सरमा यांच्याविरोधातली भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणं बाहेर काढू, असा इशाराच त्यांनी दिला.
मात्र, राजकारणात जनतेसमोर जे काही बोललं जातं त्यावरून घूमजाव करण्यात वेळ लागत नाही, असं म्हणतात.
2014 सालच्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपला घवघवीत यश मिळालं आणि त्यानंतर बरोबर 15 महिन्यांनी 28 ऑगस्ट 2015 रोजी हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.
हिमंत बिस्व सरमा आसाममध्ये जवळपास 14 वर्ष तरुण गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये अर्थ-शिक्षण आणि आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या विभागाचे मंत्री होते. काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्यानंतर सरमा दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात पॉवरफुल आणि प्रभावशाली नेते बनले.
आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागांसाठी याच महिन्यात 27 मार्चपासून तीन टप्प्यात निवडणुका होत आहेत आणि भाजप हिमंत बिस्व सरमा यांना मुख्यमंत्री करणार का, अशी जोरदार चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
 
भाजपच्या ऐतिहासिक विजयामध्ये सरमा यांची भूमिका
हिमंत बिस्व सरमा भाजपमध्ये का गेले, याची अनेक कारणं सांगितली जातात. मात्र, मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी बेबनाव आणि काँग्रेस हायकमांडकडून महत्त्व न मिळणं, ही महत्त्वाची कारणं मानली जातात.
हिमंत बिस्व सरमा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखेच 'पूर्णवेळ राजकारणी' असल्याचं म्हटलं जातं आणि म्हणूनच ते लोकप्रिय नेते आहेत. लोकभावना ओळखण्यात ते पारंगत आहेत आणि ओघवत्या वक्तृत्त्वं शैलीमुळे जनतेवर त्यांची छापही पडते.
आसाममधल्या राजकारणावर गेली अनेक वर्ष पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार बैकुंठ नाथ गोस्वामी सांगतात, "2016 साली पंतप्रधान मोदी लाटेचा प्रभाव होता. मात्र, आसाममध्ये भाजपच्या विजयामध्ये हिमंत बिस्व सरमा यांची महत्त्वाची भूमिका होती. खरंतर सात समर्थकांसह हिमंत बिस्व सरमा भाजपमध्ये गेल्याने इथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं."
"म्हणूनच 2011 सालच्या विधानसभा निवडणुकीत पाच आमदार असलेल्या भाजपने 2016 साली 60 जागा जिंकल्या. निवडणुकीआधी हिमंत बिस्व सरमा भाजपला 80 हून जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करायचे. त्यावेळी अनेकांना ते अशक्य वाटायचं. मात्र, सरमा यांचं निवडणूक गणित खरं ठरलं. भाजप आघाडीला 2016 च्या विधानसभा निवडणुकीत 86 जागी विजय मिळाला."
 
सरमा यांची नवी इनिंग
तसं पाहिलं तर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हिमंत बिस्व सरमा यांनी आपल्या कामातून स्वतःला भाजपमध्ये रिलॉन्च केलं.
त्यामुळे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यानंतर राज्यातली सर्व महत्त्वाची खाती सरमा यांना मिळाली. 2016 साली पहिल्यांदा आसाममध्ये सरकार स्थापन करणाऱ्या भाजपने आपल्या सर्व जुन्या नेत्यांना बाजूला सारत हिमंत बिस्व सरमा यांना पक्षात दुसऱ्या क्रमांकाचं स्थान दिलं.
आसाममध्ये भाजपच्या घवघवीत यशानंतर भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांना काँग्रेस मुक्त भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न ईशान्य भारतात हिमंत बिस्व सरमा पूर्ण करू शकतात, असा विश्वास वाटू लागला.
त्यामुळे 24 मे 2016 रोजी सर्बानंद सोनवाल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच काही तासातच अमित शहा यांनी ईशान्य भारतात राजकीय आघाडीसाठी नॉर्थ-ईस्ट डेमोक्रेटिक अलायंस (नेडा) नावाने एक राजकीय आघाडी उघडली आणि हिमंत बिस्व सरमा यांना या आघाडीचं संयोजकपद दिलं.
नेडाच्या माध्यमातून हिमंत बिस्व सरमा यांना आसामबाहेर कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. नेमकी त्याच वेळी अरुणाचाल प्रदेशात राजकीय उलथापालथ सुरू होती.
फोडाफोडीच्या राजकारणात मुरलेले हिमंत बिस्व सरमा यांनी अशी खेळी खेळली की काँग्रेस सोडून पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये गेलेले अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आपल्या 33 आमदारांसह एक रात्रीत भाजपमध्ये गेले.
तेव्हापासून अरुणाचल प्रदेशात भाजपचं सरकार आहे.
 
क्लिष्ट मुद्द्यांची जाण
याचप्रमाणे 2017 साली 60 जागा असलेल्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 28 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, तरीही त्यांना सरकार स्थापन करता आलं नाही. आजही तिथे 21 आमदार असलेल्या भाजपचं आघाडी सरकार आहे. कारण मणिपूर सरकारवर कुठलंही संकट ओढावताना दिसताच सर्वात आधी तिथे पाठवलं जातं ते हिमंत बिस्व सरमा यांना.
त्रिपुरासारख्या राज्यात भाजपचं सरकार स्थापन करण्यापासून मेघालय, मिझोरम आणि नागालँड इथल्या सरकारमध्ये पार्टनर बनण्यापर्यंत हिमंत यांनी ईशान्य भारतात काँग्रेसचा सफाया करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
ते कठोर परिश्रम तर करतातच. शिवाय, त्यांना क्लिष्ट विषयांची उत्तम जाणही असते आणि त्यानुसारच ते रणनीती आखतात. याच कारणांमुळे त्यांची कधी अमित शहांशी तुलना केली जाते तर कधी त्यांना भाजपचे प्रशांत किशोर म्हटलं जातं.
असं असलं तरी अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादही निर्माण होतात. नुकतंच त्यांनी असंच एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, "भाजपला 'मिया मुसलमानां'च्या मतांची गरज नाही."
मुस्लिमांना संबोधून ते म्हणाले होते, "हे तेच आहेत जे 'श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्रात' मियां संग्रहालय बनवू इच्छितात. हे तथाकथित मियां लोक जातीय आणि फंडामेंटलिस्ट आहेत. आसामी संस्कृती आणि भाषेला विकृत करण्यासाठी हे लोक कुरघोड्या करत असतात. त्यामुळे त्यांची मतं मिळवून मला आमदार व्हायचं नाही."
हिमंत बिस्व यांनी ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट म्हणजेच एआईयूडीएफचे प्रमुख बदरुद्दीन अजमलना आसामचे 'शत्रू' म्हटलं आहे. 2015 नंतर हिमंत यांनी स्वतःची हिंदुत्त्ववादी प्रतिमा तयार करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केलेली दिसतात.
आसाममध्ये बंगाली मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणावर आहे. ते एकमेकांना 'मियां' म्हणून संबोधित करतात. त्यांना 'मियां मुस्लीम' म्हणून ओळखलं जातं.
 
खरंतर भाजपने यावेळी 8 मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे हिमंत केवळ हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी अशी वक्तव्यं करतात, हे राजकीय जाणकार ओळखून आहेत.
 
राजकारणात कसे आले?
एका सर्वसामान्य कुटुंबातून येणारे हिमंत बिस्व यांचा जन्म गुवाहाटीच्या गांधी वस्तीत झाला. त्यांच्या कुटुंबातलं कुणीही राजकारणात नव्हतं. मात्र, हिमंत यांनी शालेय जीवनापासून एक उत्तम वक्ता अशी स्वतःची ओळख निर्माण केली होती.
एकदा आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंत यांनी माझ्याशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितलं होतं की, आसाम आंदोलनावेळी एका शालेय विद्यार्थ्याच्या भाषणाने माझं लक्ष वेधलं होतं. तो मुलगा हिमंत बिस्व सरमा होते.
हिमंत बिस्व शाळेत असताना राज्यात अवैध बांगलादेशींविरोधात ऑल आसाम स्टुडंट यूनियनच्या (आसू) नेतृत्त्वाखाली आसाम आंदोलन सुरू झालं होतं.
यातूनच ते विद्यार्थी राजकारणाकडे आकर्षित झाले आणि आसूमध्ये सहभागी झाले. आसूमध्ये काम करताना ते रोज संध्यासाळी वर्तमानपत्रांसाठी प्रसिद्धी पत्रक आणि इतर साहित्य घेऊन जायचे. काही वर्षांनंतर आसूने त्यांना गुवाहाटी युनिटचं सरचिटणीसपद दिलं.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर हिमंत यांनी इथल्या प्रसिद्ध कॉटन महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतलं. इथे त्यांची तीन वेळा कॉटन कॉलेज यूनियन सोसायटीच्या सरचिटणीसपदी निवड झाली.
1901 साली स्थापन झालेल्या कॉटन कॉलेजमधल्या विद्यार्थी राजकारणातून अनेक मोठे नेते निघाले. हिमंत बिस्व यांनी याच महाविद्यालयातून पॉलिटिकल सायंसमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली.
 
त्यानंतर राजकारणात सक्रीय असताना त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून पीएचडी मिळवली.
 
हिमंत बिस्व सरमा यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार नव कुमार ठाकुरिया म्हणतात, "हिमंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या हाताखाली काम करूनच स्वतःची राजकीय कारकिर्द घडवली, यात शंका नाही. मात्र, त्यांना राजकारणात आणलं ते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांनी. हितेश्वर सैकिया हेच त्यांचे पहिले राजकीय गुरू होते. 1991 साली काँग्रेसचं सरकार आलं आणि हितेश्वर सैकिया मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यावेळी त्यांनी हिमंत यांना विद्यार्थी आणि तरुण कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सल्लागार समितीचं सचिवपद दिलं. इथूनच हिमंत यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली."
 
"हिमंत सुरुवातीपासूनच खूप महत्त्वाकांक्षी होते आणि म्हणूनच त्यांना मिळालेली पहिली जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. त्यांनी राज्यातल्या सर्व शाळा-महाविद्यालयांच्या ग्रंथालयांमध्ये पुस्तक वाटपाची योजना सुरू केली आणि त्यांच्या या कामाचं बरंच कौतुकही झालं."
हिमंत यांनी त्यावेळी हितेश्वर सैकिया यांचे निकटवर्तीय म्हणून स्थान मिळवण्यासाठी बरीच मेहनत घेतली होती.
नव ठाकुरिया सांगतात, "हितेश्वर सैकिया यांना एक सवय होती. रात्री झोपण्यापूर्वी ते दुसऱ्या दिवशीची सर्व वर्तमानपत्रं वाचत. त्यांच्या सरकारविरोधात एखादी बातमी छापली जाणार असेल तर ते त्यांना आदल्या दिवशी रात्रीच कळायचं. त्यामुळे ते सरकारच्या स्पष्टीकरण विभागाला आदल्या रात्रीच उद्या काय स्पष्टीकरण द्यायचं, याची तयारी करण्याचे आदेश द्यायचे. त्यावेळी राज्यात जेमतेम 4 ते 5 वर्तमानपत्रं होती. त्यामुळे रात्री 12 वाजेच्या आधीच सैकिया यांच्याकडे वृत्तपत्रं यायची. सुरुवातीला हिमंत बिस्व सरमा हेच हितेश्वर सैकिया यांना ही वृत्तपत्रं आणि माहिती पोहोचवायचे आणि यातूनच ते हळूहळू सैकिया यांचे निकटवर्तीय बनले."
त्यांची सक्रियता आणि व्यासंग सैकिया यांनी हेरली. यातूनच काँग्रेसने 1996 साली आसाम आंदोलनातले दुसऱ्या क्रमांकाचे नेते भृगू फुकन यांच्याविरोधात जालुकबाडी विधानसभा मतदारसंघातून हिमंत यांना उमेदवारी दिली.
मात्र, हिमंत पहिली निवडणूक हरले. त्यानंतर 2001 साली हिमंत यांनी फुकन यांचा जवळपास दहा हजार मतांनी पराभव केला. तेव्हापासून ते सातत्याने जालुकबाडी मतदारसंघातून निवडून येत आहेत.
 
सुवर्णकाळ
2001 साली तरुण गोगोई आसामचे मुख्यमंत्री झाले आणि हिमंत बिस्व सरमा यांचा राजकारणातला सुवर्णकाळ सुरू झाला. 2002 साली गोगोई यांनी हिमंत यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं.
खरंतर 2001 साली काँग्रेसने तरुण गोगोई यांना आसामच्या मुख्यमंत्री पदी विराजमान केलं, त्यावेळी ते आसामच्या जनतेसाठी तुलनेने नवखे होते. कारण तोवर गोगोई केंद्राच्या राजकारणात सक्रीय होते.
आणि म्हणूनच गोगोई यांनी हिमंत बिस्व सरमा आणि रकिबुल हुसैन या दोघांचाही आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला. राज्यात ते या दोन मंत्र्यांना घेऊनच फिरायचे.
सुरुवातीला हिमंत यांना कृषी आणि नियोजन व विकास खात्याचं राज्यमंत्रिपद देण्यात आलं. मात्र, काही वर्षातच त्यांना अर्थ, शिक्षण-आरोग्य यासारख्या मोठ्या खात्यांची जबाबदारी मिळाली. पुढे हळू-हळू ते राज्याचे गोगोई यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून उदयास आले.
राज्यात सक्रीय असलेल्या बंडखोर संघटनांना नियंत्रणात ठेवण्यापासून ते अवैध नागरिकांशी संबंधित मोठ-मोठ्या विषयात हिमंत यांचं मत महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. आपल्या कामामुळे ते गोगोई यांचे राईट हँड बनले.
तरुण गोगोई यांनी त्यांना स्वतःची राजकीय आणि प्रशासकीय क्षमता सिद्ध करण्याची पुरेपूर संधी दिली. हाग्रामा मोहिलारीच्या बोडोलँड पिपल्स पक्षाला सरकारमध्ये सहभागी करुन घेणं असो किंवा इतर कुठलाही राजकीय निर्णय, हिमंत सर्वत्र असायचे.
एखाद्या मुख्यमंत्र्यांप्रमाणेच हिमंत नियमितपणे सर्व आमदारांची बैठक घ्यायचे. एकप्रकारे ते आसामचे 'शैडो सीएम' बनले. त्यामुळे त्यांनाही असं वाटू लागलं की तरुण गोगोई यांच्या निवृत्तीनंतर आसामच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची त्यांनाच मिळेल.
मात्र, 2011 साली मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर गोगोई यांनी त्यांचे चिरंजीव गौरव गोगोईला राजकारणात पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू केले. इथूनच गोगोई आणि हिमंत बिस्व सरमा यांच्या संबंधात कटुता यायला सुरुवात झाली.
 
संबंधांत कटुता
आसाममधलं राजकारण गौरव गोगोई चालवत असल्याचा आरोपही हिमंत यांनी केला. आसाममध्ये 2011 च्या विधानसभा निवडणुकीसाठी हिमंत यांना इन्चार्ज करण्यात आलं. त्या निवडणुकीत काँग्रेसने एकूण 126 पैकी 78 जागा जिंकल्या.
एवढ्या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडेल, असा विश्वास हिमंत यांना वाटत होता. मात्र, पक्षाध्यक्षांनी असा कुठलाही निर्णय घेतला नाही. इथूनच गोगोई यांना खुर्चीतून खाली खेचण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा सार्वजनिक झाली.
गोगोई यांच्या वर्तणुकीमुळे नाराज झालेले हिमंत यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची अनेकदा भेट घेतली. मात्र, त्यातून काहीच निष्पण्ण झालं नाही.
2013 आणि 2014 या काळात हिमंत यांनी पक्षाध्यक्षांना आपल्या बाजूने जास्त आमदार असल्याचं दाखवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्यासाठी आमदारांच्या स्वाक्षऱ्यांची मोहिमही राबवली. मात्र, या सर्व कवायतींचा काहीच उपयोग झाला नाही आणि मुख्यमंत्रीपदी गोगोई कायम राहिले.
संबंधात कटुता आल्यानंतर तरुण गोगोई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की ते हिमंत बिस्व सरमा यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवायचे आणि ते त्यांच्यासाठी 'ब्लू आईड बॉय' होते.
पत्रकार गोस्वामी सांगतात, "हिमंत यांनी मोदी यांच्या गुजरातमध्ये पाण्याच्या पाईपलाईनमधून मुस्लिमांचं रक्त वाहतं, हे वक्तव्यही काँग्रेस हायकमांडचं लक्ष वेधण्यासाठी केलं होतं. त्यावेळी भाजपची घोडदौड सुरू होती आणि हिमंत यांचा काँग्रेसमध्ये राहूनच मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे स्वतःला जास्तीत जास्त अँटी-भाजप दाखवण्यासाठी ते अशाप्रकारची वक्तव्य करत होते."
 
ईशान्य भारतात हिमंत यांच्याहून मोठा नेता नाही?
एवढं करूनही 2015 उजाडेपर्यंत हिमंत काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्त्वासमोर वेगळे पडले. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी गोगोई यांच्यासोबतच्या या संपूर्ण संघर्षात हिमंत विशेष करून राहुल गांधी यांच्या भूमिकेवर बरेच नाराज झाले. त्यांनी बरेचदा सार्वजनिकरित्या राहुल गांधी यांना गर्विष्ठ म्हटलं.
29 ऑक्टोबर 2017 रोजी राहुल गांधी यांनी आपल्या कुत्र्याला बिस्किट देतानाचा एक व्हीडियो ट्विटरवर शेअर केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना हिमंत यांनी लिहिलं, "त्याला (कुत्र्याला) माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण ओळखेल. मला अजूनही आठवतंय, आम्हाला आसामच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायची होती आणि तुम्ही त्याला बिस्किट देण्यात बिझी होतात."
आसामच्या राजकारणात आजघडीला हिमंत यांच्यापेक्षा दुसरा मोठा नेता असल्याचं हिमंत यांचं यश जवळून बघणारे मानतात.
मात्र, गेल्या दोन दशकात राजकीय फायद्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणाने त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांचं जे नुकसान केलं त्यामुळे त्यांच्या राजकीय शत्रुंची संख्या वाढली आहे.
हिमंत यांच्या राजकीय यशासोबत त्यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही होतात. विशेषतः शारद चिट फंड घोटाळा आणि लुईस बर्जर घोटाळ्यात त्यांचं नाव आलं आहे.
शारद समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुदिप्तो सेन यांनी कथितरित्या सीबीआयला लिहिलेल्या पत्रात आसामचे राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि मीडिया बॅरेनने त्यांना राज्यातून हुसकावून लावल्याचा आरोप केला होता.
शारद घोटाळ्यात हिमंत यांच्यावर सुदिप्तो यांच्याकडून दरमहा 20 लाख रुपये घेतल्याचा आरोपही करण्यात आला होता. सुदिप्तो यांना आसाममध्ये कुठल्याही आडकाठीशिवाय व्यवसाय करता यावा, यासाठी हिमंत यांना ही रक्कम दिली जायची, असं त्यांनी म्हटलं.
तरुण गोगोई यांनी 4 फेब्रुवारी 2019 रोजी पत्रकारांना म्हटलं होतं, "शारदा घोटाळा प्रकरणात हिमंत बिस्व सरमा यांच्या घरी धाड पडली. सीबीआय चौकशीही झाली. सीबीआयने त्यांना अनेकदा कोलकात्याला बोलवून चौकशी केली. हिमंत तुरुंगात जाण्याच्या भीतीने आणि चौकशीच्या भीतीने भाजपमध्ये गेले आहेत."
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तुरुंगात असलेले शारदा ग्रुपचे मालक सुदिप्तो सेन यांनी 2013 साली लिहिलेल्या पत्राचा दाखला देत भाजप नेते हिमंत बिस्व सरमा यांच्यावर कमीत कमी '3 कोटी रुपयांची' अफरातफर केल्याचा आरोप केला होता. मात्र, हिमंत यांनी हे सर्व आरोप निराधार आणि राजकीय कट असल्याचं म्हटलं होतं.
30 एप्रिल 2013 रोजी सीबीआयने राज्य सरकारच्या विनंतीवरून आसाममध्ये शारदा समूह घोटाळ्याचा तपास सुरू केला होता. मात्र, या प्रकरणात अजून आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही.
21 जुलै 2015 रोजी भाजपने नवी दिल्लीत आपल्या खासदारांच्या बैठकीत 'वॉटर सप्लाय स्कॅम-2010' हे शिर्षक असलेलं एक बुकलेट जारी केलं होतं. यात अमेरिकेच्या लुईस बर्जर या आंतरराष्ट्रीय बांधकाम व्यवस्थापन कंपनीच्या एका पाणी पुरवठा प्रकल्पात सेवा घेण्याच्या मोबदल्यात गुवाहाटी विकास विभागावर घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता.
आसाममध्ये त्यावेळी काँग्रेस सरकार होतं आणि हिमंत बिस्व सरमा गुवाहाटी विकास विभागाचे प्रभारी मंत्री होते. पाणी पुरवठा प्रकल्पाशी संबंधित हा कथित घोटाळा गोवा आणि गुवाहाटीत झाला होता.
याव्यतिरिक्त काँग्रेस नेते मानबेंद्र सरमा यांच्या हत्येच्या प्रकरणातही हिमंत बिस्व सरमा यांच्यावर आरोप करण्यात आले. माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंत यांनी मानबेंद्र सरमा यांच्या हत्या प्रकरणात हिमंत बिस्व सरमा यांच्यावर आरोप केले होते.
हिमंत यांना आसूमधून निलंबित करण्यामागेदेखील हेच कारण होतं, असं प्रफुल्ल कुमार महंत यांनी म्हटलं होतं. मात्र, एवढे आरोप होऊनही हिमंत यांचं अजूनतरी राजकीय नुकसान झालेलं नाही किंवा त्यांची लोकप्रियताही कमी झालेली नाही.
पत्रकार गोस्वामी म्हणतात, "हिमंत यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामान्य मतदारांवर कुठलाच परिणाम जाणवत नाही. आपल्याकडे लोकांची मानसिकताच विचित्र आहे. निवडणुकांमध्ये साधारणपणे आपल्याला काय मिळणार, हेच मतदार बघत असतो."
आणि म्हणूनच हिमंत जालुकबाडी विधानसभा मतदारसंघात प्रचार न करताच निवडणूक जिंकतात. त्यांच्या पत्नी रिनिकी भूयां सरमा एक सॅटेलाईट न्यूज चॅनल आणि एका आसामी दैनिकाच्या सीएमडी आहेत आणि हिमंत बिस्व यांच्या मतदारसंघातलं बरंचसं कामही त्याच सांभाळतात.
 
मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडणार का?
राजकारणात काहीही अशक्य नाही, असं म्हणतात. मात्र, हिमंत बिस्व सरमा मुख्यमंत्री होतील का, या प्रश्नाचं उत्तर अनेकजण नकारात्मकच देतात.
पत्रकार गोस्वामी यांचंही असंच मत आहे. ते म्हणतात, "सोनोवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वरदहस्त आहे आणि सोनोवाल हे स्वतःदेखील मोदींप्रती प्रामाणिक आहेत."
अशाच एका प्रश्नाचं उत्तर देताना हिमंत बिस्व सरमा यांनी पत्रकारांना सांगितलं होतं की पुढच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करणं पक्षाच्या संसदीय बोर्डाचा विशेषाधिकार आहे. पुढचे मुख्यमंत्रीदेखील सर्बानंद सोनोवाल हेच असतील, असं मात्र ते म्हणाले नाही.
दोन दिवसांपूर्वी हिमंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून निवडणुकीसाठीचं आसामी भाषेतलं गाणं अपलोड केलं. त्यात पक्षाची निवडणूक मोहीम सरमा यांच्या अवतीभोवती केंद्रित असल्याचं दिसतं.
या आसामी गाण्याचे बोल आहेत, "आहिसे, आहिसे, हिमंता आहिसे, आखा रे बोतरा लोई (आया है… आया है… हिमंत आया है… आशा का संदेश लेकर.) त्यामुळे आतापर्यंतच्या निवडणूक प्रचारावरून हिमंत यांनी स्वतःला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं आहे, असं म्हणता येईल."
पत्रकार ठाकुरिया म्हणतात, "हिमंत यांनी काँग्रेससाठी बरंच काम केलं होतं. काँग्रेसने तिसऱ्या कार्यकाळात हिमंत यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर आसाममध्ये भाजपला एवढं मोठं यश मिळालं नसतं. दुसरीकडे नरेंद्र मोदी हिमंत यांना मुख्यमंत्री बनवतील, याची शक्यता कमीच असल्याचं मला वाटतं."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती