औरंगाबाद निकाल : उद्धव ठाकरेंच्या 'हिरवे साप' या वक्तव्याचा निकालावर परिणाम झाला का?

शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019 (07:44 IST)
संपूर्ण राज्यात झालेल्या प्रचारात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, पीकविमा आणि कर्जमाफी हे मुद्दे उपस्थित केले, पण औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या सभेत त्यांनी म्हटलं की औरंगाबादला हिरव्या सापांचा विळखा पडला आहे.
 
औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडून आले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलं होतं.
 
2019 लोकसभा निवडणूक चंद्रकांत खैरे हरले. त्या जागेवर एमआयएमचे खासदार निवडून आले. या चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हरल्यामुळे औरंगाबादमध्ये युतीचं आणि विशेषतः शिवसेनेचं भवितव्य काय असा प्रश्न विचारला जात होता, पण या निवडणुकीत औरंगाबादकरांनी युतीच्याच पारड्यात आपलं मत टाकलं.
 
औरंगाबाद शहरातल्या तीन जागा, फुलंब्री, वैजापूर, पैठण, सिल्लोड, कन्नड आणि गंगापूर या सर्व ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचाच उमेदवार निवडून आला आहे.
 
काँग्रेसच्या कल्याण काळेंचा पराभव करत भाजपचे हरिभाऊ बागडे पुन्हा एकदा आमदार झाले आहेत. हरिभाऊ बागडे हे सातव्यांदा आमदार बनले आहेत. 2009 साली त्यांचा कल्याण काळेंनी पराभव केला होता. हा अपवाद वगळता हरिभाऊ बागडे हे 1985 पासून 2019 पर्यंत सातत्याने विधासभेवर गेले आहेत. हरिभाऊ बागडे हे विधानसभेचे सभापती आहेत.
 
कन्नड विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर कन्नडचं वातावरण तापलं होतं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असा आरोप केला होता. त्यामुळे निकालानंतर नेमकं काय चित्र राहील याची उत्सुकता सर्वांना लागली होती. या ठिकाणी शिवसेनेचे उदयसिंह राजपूत निवडून आले आहेत.
 
पैठणमध्ये शिवसेनेचे संदिपान भूमरे यांनी राष्ट्रवादीच्या राधाकृष्ण गोर्डे यांचा पराभव केला. वैजापूरमध्येही शिवसेनेचे रमेश बोरनारे जिंकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलासराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे.
 
सिल्लोडमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार विजयी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच ते काँग्रेसमधून शिवसेनेत आले.
 
गंगापूरमधून भाजपचे प्रशांत बंब हे पुन्हा निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या संतोष पाटील यांचा पराभव केला.
 
औरंगाबाद शहरात गेल्या निवडणुकीत एक आमदार एमआयएमचा होता. पण यावेळी शहरातल्या तीनही जागा युतीलाच मिळाल्या आहेत. औरंगाबाद मध्य मधून प्रदीप जैस्वाल यांनी नसीरुद्दीन सिद्दिकी यांना पराभूत केलं. औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाठ निवडून आले आहेत. तर औरंगाबाद पूर्वमधून अतुल सावे यांनी एमआयएमच्या अब्दुल गफार यांचा पराभव केला.
 
जिल्ह्यात 9 पैकी 6 जागा शिवसेनेकडे तर तीन जागा भाजपकडे आहेत.
 
औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या विजयाची कारणं
औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. ही जागा भाजपकडे होती पण शिवसेनेनं ही जागा सत्तार यांच्यासाठी सोडून घेतली. ती जागा शिवसेनेच्या खात्यात आली.
 
अब्दुल सत्तार यांच्यावरूनच हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं होतं. पण या गोष्टीचा हर्षवर्धन जाधव यांना मतांसाठी फायदा झाला नाही.
 
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की औरंगाबादला हिरव्या सापांचा विळखा पडला आहे. या ठिकाणी हिरवा काढून भगवा फडकवण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या धार्मिक आवाहनामुळे शिवसेनेचा विजय झाला का?
 
"उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा जनतेवर थेट परिणाम झाला की नाही हे सांगता येऊ शकत नाही, पण शिवसेनेनं यावेळी हिंदू मतं फुटू दिली नाही. लोकसभा निवडणुकीला हिंदूंची मतं फुटली होती. पण यावेळी तसं झालं नाही. शिवसेनेला आपला कोअर मतदार आपल्याकडेच ठेवण्यात यश आलं," असं मत औरंगाबादमध्ये राहणारे ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे व्यक्त करतात.
 
औरंगाबाद शिवसेनेनं जिंकण्यात धार्मिक ध्रुवीकरणाचा मोठा वाटा आहे, असं ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांना वाटतं.
 
"1986 आधी औरंगाबाद हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. पण 1988 नंतर शिवसेनेच्या उदयानंतर ही समीकरणं बदलली. त्यानंतर औरंगाबादमध्ये निवडणुका या धार्मिक रंगावरच होऊ लागल्यात. आताची निवडणूक देखील त्याला अपवाद नाही. उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानामुळे हिंदुत्ववादी मतदार सुखावला असू शकतो," असं भालेराव सांगतात.
 
'जनतेचे प्रश्न मांडल्यामुळेच जनतेनं स्वीकारलं'
धार्मिक ध्रुवीकरणामुळे शिवसेना जिंकली आहे का, हे विचारण्यासाठी औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा झाला नसल्याचं त्यांनी म्हटलं.
 
"आम्ही ही निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढवली, कर्जमाफी, पीकविमा हे मुद्दे आम्ही उचलून धरले त्यामुळे आम्ही जिंकलो आहोत. जिल्ह्यात आमचा स्ट्राइक रेट 100 टक्के आहे.
 
"शिवसेनेचं हिंदुत्व हे व्यापक हिंदुत्व आहे. सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन देशहिताचा विचार करणारं हे हिंदुत्व असल्यामुळे आम्हाला जनतेनं स्वीकारलं आहे असं दानवे म्हणाले. हर्षवर्धन जाधव यांनी पक्षप्रमुखांबद्दल अनुचित शब्दप्रयोग केल्यामुळे लोकांनी त्यांना नाकारलं," असंही दानवे सांगतात.
 
एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र न आल्याचा फटका बसला आहे का?
एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने ही निवडणूक एकत्र लढवली नाही याचा फटका औरंगाबाद मध्य या मतदारसंघावर एमआयएमला बसला. शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल हे निवडून आले.
 
एमआयएमचे नसीरुद्दीन सिद्दिकी आणि वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांच्या मतांची बेरीज ही शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा जास्त आहे. (स्रोत- निवडणूक आयोग वेबसाइट, संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या अपडेट्स) एमआयएम आणि वंचित एकत्र न आल्यामुळे त्यांचं नुकसान झालं आहे. दलित आणि मुस्लीम व्होट बेस वेगळा झाल्याचा हा परिणाम आहे, असं भालेराव सांगतात.
 
औरंगाबादमध्ये एमआयएमचा पराभव का झाला हे जाणून घेण्यासाठी बीबीसीनं औरंगाबादचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांची बाजू आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निष्प्रभ प्रचार
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रचार केला नाही. त्यांचे नेते या भागात फार फिरले देखील नाहीत आणि त्यांच्या प्रचारात जोरही नव्हता असं मत भालेराव यांनी व्यक्त केलं.
 
काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी कबुली दिली आहे की मतदार काँग्रेस आघाडीच्या बाजूनेच होते आम्ही कमी पडलो.
 
भाजपने जिल्ह्यातल्या तीनही जागा राखल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती