शिवसेना आता भाजपला मुख्यमंत्रिपदासाठी ब्लॅकमेल करणार का?

शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019 (07:35 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालात भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना किंगमेकर बनली आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका काय असेल, याकडे सगळ्यांच लक्ष असेल.
 
भाजपला यंदा 105 च्या आसपास जागा मिळाल्या आहेत. पाठोपाठ शिवसेनेला 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 तर काँग्रेसला 44 च्या आसपास जागा मिळतील. अनेक ठिकाणची मतमोजणी अजूनही सुरू असून संध्याकाळी उशिरापर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
 
अडचण समजून घेऊ शकत नाही
जनतेने दिलेला कौल स्पष्ट होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद घेतली. जागावाटपाच्या वेळी भाजपची अडचण आपण समजून घेतली होती. पण आता भाजपची अडचण समजून घेऊ शकत नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
 
उद्धव ठाकरे म्हणाले, "हा जनादेश सर्वच राजकीय पक्षांचे डोळे उघडणार आहे. मुख्यमंत्री कुणाचा होईल हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी युती झाली तेव्हा 50 टक्क्यांचा फॉर्म्यूला ठरला होता. तो लपून ठेवण्यात अर्थ नाही. जागावाटप प्रत्येकी 144 असाच तो फॉर्म्यूला ठरला होता."
 
जे ठरवलं होतं त्याची आठवण
उद्धव ठाकरे यांनी वारंवार 18 फेब्रुवारी 2019 ला युतीची घोषणा करताना घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला. हा भाजपला इशारा नसून त्यांना त्या गोष्टीची आठवण करून देत असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.
 
"अत्यंत पारदर्शकपणाने निर्णय घेऊन मगच सत्तास्थापनेचा दावा करू. सत्तेची हाव माझ्या डोक्यात नाही. आधी ठरल्याप्रमाणेच सत्तेचं वाटप होईल. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे भाजपच्या अडचणी मी समजून घेतल्या. मी कमी जागा स्वीकारल्या. पण आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार असेल तर त्यांच्या सगळ्याच अडचणी मी समजून घेऊ शकणार नाही. आम्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू. त्यानंतर अत्यंत पारदर्शकपणे भाजपच्या दिल्लीच्या नेत्यांशी चर्चा करू. अमित शाह येतील तेव्हा आम्ही चर्चा करणार आहोत," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
 
आमचं ठरलंय, योग्य वेळी कळेलच
शिवसेनेच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही पत्रकार परिषद झाली. "उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद मी ऐकली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं ठरलेलं आहे. दोन्ही पक्षांचं जे ठरलंय त्याप्रमाणेच आम्ही पुढे जाणार आहोत, त्याबद्दल तुम्हाला योग्य वेळी कळेल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
18 फेब्रुवारीची 'ती' पत्रकार परिषद
उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केलेल्या पत्रकार परिषदेबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मुंबईत 18 फेब्रुवारीला झालेल्या त्या पत्रकार परिषदेत अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेतच लोकसभा आणि विधानसभेसाठी युतीची घोषणा करण्यात आली होती.
 
त्यावेळी फडणवीस म्हणाले होते, "आपल्या सर्वांनाच याची कल्पना आहे, की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्ष 25 वर्षं युतीमध्ये एकमेकांसोबत सातत्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात वावरले आहेत. काही मुद्द्यांवर आमच्यामध्ये मतभेद झाले असतील परंतु सैद्धांतिक दृष्ट्या हे दोन्ही पक्ष हिंदुत्त्ववादी आहेत. त्यामुळे आमचा मूळ विचार मात्र सारखा राहिला आहे. म्हणूनच इतकी वर्षं राजकारणात आम्ही सोबत राहिलो. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काही कारणाने आम्ही सोबत राहू शकलो नाही. परंतु त्यानंतर साडेचार वर्षे केंद्रात आणि राज्यात आम्ही सरकार चालवत आहोत."
 
नंतर राममंदीर, शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, नाणार प्रकल्प याबाबतची शिवसेनेची भूमिका मान्य केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं.
 
ते पुढे म्हणाले होते, "पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार यावं, देशहिताचे निर्णय त्या माध्यमातून व्हावेत असा विचार आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23 जागा लढेल आणि भाजप 25 जागा लढेल. विधानसभेच्या संदर्भात मित्रपक्षांशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करण्यात येतील. त्यातून उरलेल्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप लढेल. गेल्या पाच वर्षात आम्ही जे काही काम केलं आहे, त्याच्या बळावर जनता आम्हाला पुन्हा निवडून देतील असा विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा सरकार आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या यांची समानता राखण्याचाही आम्ही निर्णय घेतलेला आहे."
 
त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, "शिवसेना आणि भाजपला हरवण्यासाठी अविचारी लोक एकत्र आले आहेत. दोन्ही पक्ष एकदिलाने एकत्र आले तर हिंदू मन आनंदी होईल. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपची युती 30 वर्षांपूर्वी झालेली होती. पण गेल्या पाच वर्षांत काही कटू अनुभव मिळाले. झालं गेलं विसरून जाणार नाही. काही गोष्टी आम्ही लक्षातही ठेवू. या गोष्टी पुन्हा अनुभवायला येऊ नये यासाठी त्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवू."
 
शिवसेनेचं राजकीय दबावतंत्र
राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात, "शिवसेनेने सध्या घेतलेली भूमिका ही त्यांच्या राजकीय दबावतंत्राचा भाग आहे. त्यांचं सगळं ठरलंय असं ते आजवर सांगत आले आहेत. पण काय ठरलंय याबाबत खुलून बोलायला कुणीच तयार नाहीत.
 
ते पुढे सांगतात, "भाजपकडे आपल्या मागण्या ते ठेवतील. आम्हाला मुख्यमंत्रिपद द्या नाहीतर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ असं ते म्हणतील. त्यामुळे सत्ता राखण्यासाठी भाजपला त्यांच्या काही मागण्या मान्यही कराव्या लागतील. उद्धव-पवार आणि काँग्रेस काय राजकारण करतात त्यापेक्षा मोदी-शहा काय राजकारण करतात, यावर शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे."
 
राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्कीन सांगतात, "शिवसेनेची क्षमता आता वाढली आहे, असा स्पष्ट संदेश उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. ज्याप्रमाणे मागच्या पाच वर्षांत भाजपने राजकारण केलं होतं. त्यामध्ये दुय्यम खाती त्यांना स्वीकारवी लागली होती. लोकसभेपासून भाजप म्हणेल त्या पद्धतीने शिवसेनेने भूमिका घेतली होती. पण इथून पुढं शिवसेनेची भूमिका वेगळी असू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे."
 
अटी आणि शर्थींनुसार सत्ता स्थापन होणार
संजय मिस्कीन सांगतात, यंदाचं महाराष्ट्रातलं सरकारही अटी आणि शर्थींनुसार बनणार आहे. मागच्या वेळी या अटी आणि शर्थी भाजपच्या होत्या. पण यावेळी अटी आणि शर्थी शिवसेनेच्या असणार आहेत. अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपद किंवा नगरविकास, ग्रामविकास, गृहमंत्रालय यांसारख्या मलईदार खात्यांचा आग्रह शिवसेना धरू शकते.
 
"शिवसेना सत्तेचा जास्तीत जास्त वाटा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करणार. पण मुख्यमंत्रिपद मिळत असल्यामुळे ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणार नाहीत. त्यांचे राजकीय केमिस्ट्री मुळात जमणारी नाही. त्यामुळे ते त्यांच्यासोबत जाणं शक्य नाही, त्यापेक्षा भाजपकडून समसमान किंवा शक्य असेल तर जास्तीत जास्त सत्तेचा वाटा घेण्याचा प्रयत्न ते करतील," असं अकोलकर सांगतात.
 
रिस्क न घेता पक्ष वाढवण्याचे प्रयत्न
अकोलकर सांगतात, "केंद्राच्या सत्तेत शिवसेना सामील आहे. त्यामुळे राज्यात पक्षाचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जातील अशी चिन्ह नाहीत. बाळासाहेब ठाकरे रिस्क घेऊन राजकारण करायचे. पण उद्धव ठाकरे रिस्क घेत नाहीत. त्यांची आजवरची शैली पाहता काम्प्रोमाईज प्रकारचं राजकारण करतात. मोदी-शहा यांच्या राजकारणापुढे शिवसेना काही वेगळं पाऊल उचलेल, असं सध्यातरी वाटत नाही.
 
शिवसेना सत्तेचा वापर आता पक्ष वाढवण्याच्या दृष्टीकोनातून करताना दिसेल. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला शहरी भागात जास्त जागा लढवायला मिळाल्या नव्हत्या. पण लोकांशी संबंधित खात्यांची मागणी करून त्या मंत्रालयाच्या माध्यामातून शहरी भागात पक्ष मजबूत करण्यावर शिवसेना लक्ष केंद्रीत करणार आहे, असं संजय मिस्कीन सांगतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती