उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा राखली नाही – शरद पवार

गुरूवार, 24 ऑक्टोबर 2019 (15:13 IST)
उदयनराजेंनी साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा राखली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली.
 
उदयनराजेंनी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ही जागा जिंकली होती, मात्र विधानसभा निवडणुकीच्या बरोबर झालेल्या या पोटनिवडणुकीत ते साठ हजारहून जास्त मतांनी पिछाडीवर आहेत.
 
त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसच्याच श्रीनिवास पाटील यांच्याशी आहे. इथेच साताऱ्यातच शरद पवारांनी घेतलेली भर पावसातली सभा गाजली होती.
 
उदयनराजे भोसलेंनी लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांना लगेचच उमेदवारीही दिली गेली.
दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उदयनराजेंविरोधात कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याविषयी बऱ्याच चर्चा रंगल्या. सुरूवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत होते. मात्र, राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवलं गेलंय.
श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. दोन वेळा ते खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले आहेत. ते सिक्कीमचे राज्यपालही होते.
 
साताऱ्यातील लोकसभेची पोटनिवडणूक उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशीच झाली.
 
उदयनराजे भोसलेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. तर दुसरीकडे, श्रीनिवास पाटलांसाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरले होते. पवारांची भर पावसात झालेल्या सभेची तर महाराष्ट्रासह देशात चर्चा झाली.
 
उदयनराजे भोसलेंचं किती आव्हान?
श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीमुळे उदयनराजे भोसले यांच्यासमोर निश्चितच मोठं आव्हान उभं राहिलं आहे, असं मत दैनिक प्रभातच्या सातारा आवृत्तीचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांनी व्यक्त केलं.
 
"यावेळी उदयनराजेंविषयी मतदारसंघात फार अनुकूल वातावरण नाहीये. जिल्ह्यातील रखडलेली विकासकामं हे त्याचं प्रमुख कारण आहे. साताऱ्याचा औद्योगिक विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. सातारा MIDC मधील अनेक मोठ्या उद्योगांनी आपलं उत्पादन बंद केलं आहे. त्याचा परिणाम आपसूकच साताऱ्यातील लहान उद्योगांवरही झाला आहे. त्यामुळे इथं रोजगाराच्या संधी कमी आहेत. शिक्षणसंस्थांचाही पुरेसा विकास झालेला नाही. त्यामुळे इथले तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या संधींसाठी बाहेर पडत आहेत."
 
16 व्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांची लोकसभेतील उपस्थिती अवघी 27 टक्के होती. त्यांनी प्रश्नही उपस्थित केले नाहीत, कोणते खाजगी विधेयक मांडले नाही की चर्चेत भागही घेतला नाही.
 
हेच मुद्दे अधोरेखित करत श्रीकांत कात्रे यांनी म्हटलं, की उदयनराजे भोसले हे लोकप्रिय आहेत. पण त्याची कारणं वेगळी आहेत. राजकारणाबाबत ते गंभीर असल्याचं कधी दिसलं नाही.
 
उदयनराजेंसाठी प्रतिष्ठेची लढत
ही लढत श्रीनिवास पाटलांपेक्षाही उदयनराजे भोसलेंसाठी प्रतिष्ठेची आहे, असं मत महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं.
 
"सातारा लोकसभा मतदारसंघ हा उदयनराजेंपेक्षाही राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळेच 2009, 2014 आणि अगदी 2019 च्या निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली होती. आता त्यांना राष्ट्रवादीशिवायही या मतदारसंघात आपण बहुमतानं निवडून येऊ शकतो, हे सिद्ध करावं लागणार आहे," असं चोरमारे यांनी म्हटलं.
 
सातारा मतदारसंघातील विधानसभा निहाय समीकरणं पाहिली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा दिसून येत असल्याचंही विजय चोरमारे यांनी म्हटलं.
 
"सातारा-जावळी मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले एकत्र झाल्यामुळे त्यांना फायदा होईल. पण कोरेगाव, वाई, कराड दक्षिण, कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी वरचढ ठरू शकते. पाटण मतदारसंघात शंभूराजे देसाई हे शिवसेनेचे असले तरी इथूनही राष्ट्रवादीला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या मोठी आहे."
 
यशवंतराव चव्हाणांनंतर साताऱ्यातील लोकांनी शरद पवारांना तसाच पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर विधानसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये अकरापैकी दहा मतदासंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला होता. श्रीनिवास पाटील यांच्या पाठीशी राष्ट्रवादीची ही ताकद आहे, असं चोरमारे यांनी म्हटलं.
 
उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्यात झालेल्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारकरांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या. रस्त्यांसाठी पन्नास कोटींचा निधी, हद्दवाढीला मंजुरी अशा अनेक घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याचा, या आश्वासनांचा उदयनराजेंना फायदा होऊ शकतो का, या प्रश्नाला उत्तर देताना चोरमारे यांनी नकारात्मक उत्तर दिलं.
 
"निवडणुकीत आश्वासनं दिलीच जातात. त्यांचं पुढं काय होतं, हे लोकांना चांगलंच माहिती असतं. दुसरं म्हणजे उदयनराजेंनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशावर फारशा सकारात्मक प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. सहा महिन्यांतच आपण पक्षाचा राजीनामा का दिला, या प्रश्नावर त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे उदयनराजेंसाठी ही निवडणूक निश्चितच आव्हानात्मक आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती