महाराष्ट्रात लशींचा तुटवडा का भासतोय?

बुधवार, 7 एप्रिल 2021 (18:15 IST)
कोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा स्फोट झालाय. राज्यात सद्यस्थितीत 4 लाख 70 हजारपेक्षा जास्त अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
 
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोव्हिड-19 विरोधी लशींची तुटवडा असल्याचं मान्य केलंय. "राज्यात तीन दिवस पुरेल इतकाच लशींचा साठा आहे. तीन दिवसात लस मिळाली नाही तर लसीकरण बंद पडेल," असं टोपे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
 
राज्यातील काही जिल्ह्यात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद करण्यात आलंय.
 
कोरोनाचा संसर्ग राज्यभरात मोठ्या झपाट्याने पसरतोय. शहरी आणि ग्रामीण भागात पसरलेल्या कोरोना संसर्गामुळे मिनी-लॉकडाऊन करण्यात आलंय. देशातील 10 कोव्हिड-19 हॉटस्पॉट जिल्ह्यांपैकी 7 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे महाराष्ट्र देशातील कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनलाय.
 
एकीकडे, महाराष्ट्र कोरोना संसर्गाचा मुकाबला करत असताना. दुसरीकडे, कोव्हिड-19 विरोधातील लढाईत ढाल बनलेल्या कोरोनाविरोधी लशीचा राज्यात तुटवडा भासू जाणवू लागला आहे.
 
महाराष्ट्रात कोव्हिड-19 विरोधी लशीचा तुटवडा
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, राज्यात अत्यंत वेगाने पसरणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण सर्वांत प्रभावी उपाय आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात सद्य स्थितीत दररोज साडेचार लाख लोकांचं लसीकरण केलं जातंय.
 
लशींच्या तुटवड्याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "सद्यस्थितीत राज्यात फक्त 14 लाख कोरोनाविरोधी लशींचे डोस शिल्लक आहेत. हा साठा फक्त पुढील तीन दिवस पुरेल इतकाच आहे. तीन दिवसात साठा आला नाही तर लसीकरण बंद पडेल."
 
"राज्यात काही केंद्रांवर लसीकरण थांबवण्यात आलंय. लस उपलब्ध नसल्याने लोक परत जात आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे, केंद्राकडून न मिळणारे लशींचे डोस. राज्याला दर आठवड्याला 40 लाख लशींची गरज आहे. लोकांना लसीकरण केंद्रातून परतावं लागणं, राज्यासाठी ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे," असं आरोग्यमंत्री राजेश टोपे पुढे म्हणाले.
 
राज्यातील कोव्हिड-19 विरोधी लशींच्या तुटवड्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना माहिती दिलीये.
 
20 ते 40 वयोगटातील लोकांना लस द्या-टोपे
महाराष्ट्रात कोव्हिड-19 व्हायरसमध्ये दोन म्युटेशन (बदल) झाल्याचं आढळून आलंय. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरात हे म्युटेशन आढळून आले आहेत.
 
तज्ज्ञ सांगतात, म्युटेशन झालेला व्हायरस अधिक वेगाने पसरतोय. शरीरातील रोगप्रतिकारशक्तीला हा म्युटेशन झालेला व्हायरस चकवा देत असल्याने, याची संसर्गक्षमता जास्त अधिक आहे.
 
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत बैठकीनंतर राजेश टोपे म्हणाले, "राज्यात सद्य स्थितीत 20 ते 40 वयोगटातील लोकांना कोरोनाचा जास्त संसर्ग होतोय. हे लोक कामानिमित्त फिरत असतात. त्यामुळे या वयोगटातील लोकांमध्ये पसरणारा संसर्ग रोखायचा असेल तर लसीकरण हा एकच प्रभावी उपाय आहे."
 
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठकीत 25 वर्षांवरील लोकांचं लसीकरण करावं अशी मागणी केली होती.
 
लसीकरणाबाबत काय म्हणतंय केंद्र सरकार ?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोनाविरोधी लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. राज्यात तब्बल 81 लाख लोकांना कोरोनाविरोधी लशीचा पहिला डोस देण्यात आलाय. तर आठ लाखपेक्षा जास्त लोकांनी दोन डोस घेतले आहेत.
 
देशभरात आत्तापर्यंत 8 कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलंय.
 
केंद्रीय आरोग्यसचिव राजेश भूषण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "लसीकरणाचं प्रमुख उद्दीष्ठ संसर्गामुळे मृत्यू रोखणं आहे. ज्याला लस हवी त्याला दिली जाईल हे लसीकरण मोहिमेचं उद्दीष्ट नाही. ज्याला गरज त्याला लस द्यावी, हे प्रमुख ध्येय आहे."
 
"कोणत्याही देशाने विचार न करता 18 वर्षावरील व्यक्तींना लस द्यावी, असा निर्णय घेतला नाही," असं राजेश भूषण पुढे म्हणाले.
 
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. यासाठी 30 टीम महाराष्ट्रात, 11 छत्तीसगडमध्ये आणि 9 पंजाबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत.
 
महाराष्ट्रातील विविध शहरात लशीची उपलब्धता
मुंबई
 
मंगळवारी शहरात 10 हजारपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
 
मुंबईत दररोज साधारणत: 50 हजार लोकांना कोव्हिडविरोधी लस दिली जातेय. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या माहितीनुसार, मुंबईत कोव्हिड-19 विरोधी लशीचे एक लाखांपेक्षा जास्त डोसेस शिल्लक आहेत.
 
"दोन दिवस पुरेल इतकाच लशींचा साठा सद्य स्थितीत महापालिकेकडे उपलब्ध आहे," असं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले.
 
पुणे
 
पुण्यात 6 एप्रिलला कोव्हिशिल्डचे 15,300 आणि कोव्हॅक्सीनचे फक्त 120 डोस शिल्लक असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
 
बीबीसीशी बोलताना पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार म्हणाले, "मंगळवारी रात्री उशीरा कोव्हिशिल्डचे 25,000 आणि कोव्हॅक्सीनचे 10,000 डोस मिळाले आहेत. पण, हा साठा फक्त एक दिवस म्हणजे आज (बुधवारी) पुरेल इतकाच आहे. लस उपलब्ध झाली नाही तर, उद्या लसीकरण कसं करायचं हा प्रश्न आहे."
 
"लशीचा साठा उपलब्ध झाला तर उद्या लस देता येईल," असं डॉ. पवार पुढे म्हणाले.
 
देशातील कोरोना हॉटस्पॉटमध्ये पुणे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात कोरोनाग्रस्तांचा पॉझिटिव्हीटी रेट 35 टक्के आहे.
 
विदर्भ
 
गोंदिया जिल्ह्यात कोव्हिड-19 विरोधी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण थांबवण्यात आलंय. याबाबत बीबीसीने गोंदियाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांच्याशी संपर्क केला.
 
"जिल्ह्यात लस उपलब्ध नाही," असं कापसे बीबीसीशी बोलताना म्हणाले.
 
हीच परिस्थिती विदर्भातील इतर जिल्ह्यांची आहे. अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लशींचा तुटवडा आहे.
 
अमरावतीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक करंजेकर बीबीसीशी बोलताना म्हणतात, "जिल्ह्यात कोव्हिडविरोधी लशींचा पुढील 3 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. आत्तापर्यंत अमरावती जिल्ह्यात 2 लाख डोस पुरवण्यात आलेत. ग्रामीण भागातून कोरोनाविरोधी लशीचा साठा अल्प असल्याचं सांगण्यात आलंय."
 
राज्याच्या लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. डी. एन. पाटील टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, "केंद्रसरकारकडून लशींचा पुरवठा सातत्याने होणं गरजेचं आहे. राज्यात दररोज 4 लाखांपेक्षा जास्त लोकांना लस दिली जात आहे."
 
कोल्हापूर-सांगली
 
कोल्हापूर आणि सांगली जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात फक्त आज (बुधवार) पुरता लशींचा साठा उपलब्ध आहे. राज्य सरकारकडे लशींबद्दल मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध झाल्यावर लस पुरवठा करण्यात येईल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय.
 
नाशिक
 
उत्तर महाराष्ट्रासाठी कोव्हॅक्सिनचे 32,280 डोस मिळाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. लशीचे डोस नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांसाठी आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाने 40 लाख डोसची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात नाशिकमध्ये कोव्हिडविरोधी लशी संपल्याकारणाने लसीकरण मोहीम थांबवण्यात आली होती.
 
तर, अहमदनगर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ सांगळे म्हणाले, "जिल्ह्यात लशींचा तुटवडा आहे. काही केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. बुधवारी सरकारकडून लस उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाली आहे."
 
तर, ठाण्यात पुढील 3-4 दिवस पुरेल इतके लशीचे डोस उपलब्ध असल्याची माहिती, महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी दिली.
 
लशीचा तुटवडा का?
देशात जानेवारी महिन्यात जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली होती. देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन कोरोनाविरोधी लसी असून, राज्यांना पुरवठा केंद्र सरकारकडून केला जातो.
 
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लशींचा पुरेसा साठा येत नसल्याचा आरोप केला होता. यावरून केंद्र विरुद्ध राज्य असा वाद पेटला होता.
 
राज्यातील लशीच्या तुटवड्याबाबत बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणतात, "कोणत्या राज्याला किती लस द्यायची हे केंद्र सरकार ठरवतं. त्यामुळे लशीचा तुटवडा निर्माण झालाय."
 
"लसीकरण मोहिमेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. राज्यांना लस देण्याबाबत रणनिती आखण्याचा अधिकार असला पाहिजे. राज्यातील परिस्थिती स्थानिक अधिकाऱ्यांना चांगली माहिती असते. त्यामुळे लसीकरणात राजकारणापेक्षा शास्त्रीय कारणांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे," असं डॉ. वानखेडकर पुढे म्हणतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती