श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (22:41 IST)
ज्ञान,भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी संगमातून निस्वार्थ सेवेचा नवा अध्याय रचणारे श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त,व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज दुःखद निधन झाले. मागील तीन-चार दिवसांपासून मल्टीऑर्गन फेलीवरमुळे श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. कुठल्याही रुग्णालयात दाखल होण्यास भाऊंनी नकार दिल्याने त्यांच्या सूचनेनुसार भाऊंवर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनात पूर्ण मेडिकल सेटअपसह ट्रीटमेंट करण्यात येत होती. काल (3 ऑगस्ट) सकाळी त्यांचा रक्तदाब कमी झाला.. तब्येत अधिक सिरीयस झाली.. मेडिकल टीमने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. 
 
आज सायंकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी भाऊंनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान या दुःखद घटनेची माहिती मिळताच राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे शेगावात दाखल झाले आहेत.'सेवा परमो धर्म’ या तत्त्वानुसार  निःस्वार्थीपणे श्रध्दापूर्वक काम करणारे शिवशंकरभाऊ म्हणजे माणसामधला देवमाणूस..वयाच्या अठराव्या वर्षी श्री आज्ञेने शिवशंकरभाऊ मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यात सामील झाले. 
 
श्रद्धा, विश्वास आणि भक्ती या त्रिसूत्रीनुसार काम करत शिवशंकरभाऊंनी मंदिर व्यवस्थापनाचे एक उत्कृष्ट उदाहरण जगासमोर ठेवले आहे. कुठलाही मोबदला न घेता संपूर्ण निष्ठेने आणि श्रध्देने काम करणारे मंदिरातील हजारो सेवाधारी, डोनेशन सारख्या आर्थिक लाभला डावलून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण उपलब्ध करुन देणाऱ्या संस्थानच्या शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा, भक्तनिवास, जागतिक किर्तीचा आनंदसागर प्रकल्प..आणि अशा अनेक सेवाकार्याची उभारणी शिवशंकरभाऊंनी केली. 
 
श्री गजानन महाराज संस्थानच्या या अवाढव्य कारभाराचे नियोजन आणि नियंत्रण करण्याची शिवशंकरभाऊंची निस्वार्थ शैली जगभरातल्या अर्थतज्ञ, नियोजन तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरली आहे. असा हा कर्मयोगाचा दीपस्तंभ आज अकाली विझला आहे..शिवशंकरभाऊंच्या अकस्मात निधनाने विदर्भाची पंढरी पोरकी झाली असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे..शिवशंकर भाऊंना श्री. चरणी चिरशांती लाभो हीच प्रार्थना. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती