मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांना घरभाडं नाही

गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (09:06 IST)
मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केली होती. आता प्रत्यक्षात कारवाईला सुरवात झाली असून, याची अंमलबजावणी सुध्दा खुद्द आमदार बंब यांच्या मतदारसंघातून सुरू झाली आहे.
 
खुलताबाद गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना एक पत्र पाठवले असून, मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता या महिन्यापासून बंद करण्यात येणार असल्याचा उल्लेख केला आहे. एबीपी माझा ने ही बातमी दिली आहे.
 
खुलताबाद गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांना पाठवलेल्या पत्रात सप्टेंबर 2022 च्या पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठवितांना घरभाडे भत्ता समाविष्ट करू नयेत असे निर्देश दिले आहेत.
 
त्यांच्या या पत्राने मोठी खळबळ उडाली आहे, तर शिक्षक संघटनांनी या आदेशाला विरोध केला आहे. खुलताबाद तालुका आमदार प्रशांत भाऊ यांच्या मतदारसंघात येतो.
 
दरम्यान, गंगापूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेतील बहुतांश शिक्षक मुख्यालय उपस्थित राहत नसल्याचा मुद्दा प्रशांत बंब यांनी उपस्थित केला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती