मुख्यमंत्र्यांनी आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे

मंगळवार, 4 डिसेंबर 2018 (09:12 IST)
महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी रस्त्यावर आहे व दैवी चमत्कार संचारलेले मुख्यमंत्री असतानाही बेळगावसह सीमा भागात मराठी माणूस चिरडला जात आहे. दैवी चमत्कारच आता सीमा प्रश्न सोडवू शकेल व ती ‘पॉवर’आज फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे! गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने अंगारे–धुपारे उडवले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनवाले नरेंद्र दाभोलकर यांचा आत्माही आता सांगत असेल, माझे खुनी पकडू नका! मुख्यमंत्र्यांनी अशा आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून दिला आहे.
 
देवांना आणि नेत्यांनाही त्यांचे भगतगण अडचणीत आणीत असतात. वर नरेंद्र व खाली देवेंद्र यांच्या बाबतीत हेच घडताना दिसत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे खास भगतगण मंत्रिमहोदय गिरीश महाजन यांनी अशी पंचारती ओवाळली आहे की जगातील सर्व जंतरमंतर, जादूटोणावाले भूमिगत झाले आहेत. अडचणींमधून मार्ग काढण्याची मुख्यमंत्र्यांना ‘दैवी’ शक्ती प्राप्त झाल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. दैवी शक्तीच्या आधारे मुख्यमंत्री कारभार करीत असून विधानसभा, कॅबिनेट वगैरे सर्व बिनकामाचे आहे, हा त्याचा दुसरा अर्थ होतो. भाजपच्या एका प्रवक्त्याने मागे नरेंद्र मोदी हे विष्णूचे तेरावे अवतार असल्याचे जाहीर करून खुशामतखोरीचे शिखर गाठले होते. आता देवेंद्र महाराजांना मखरात बसवून त्यांची आरती सुरू झाली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती