जावयाने सासरच्या छळाला कंटाळून केली आत्महत्या

सोमवार, 15 जानेवारी 2018 (09:23 IST)
सासू-सासऱ्याच्या छळाला कंटाळून जावयानेच राहत्या घरात आतून दरवाजा बंद करून विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. 13) रात्री साडेआठ पूर्वी इंद्रायणी नगर, तळेगाव दाभाडे ता. मावळ येथे घडली. उपचारापूर्वीच जावयाचा मृत्यू झाला. सासरच्या व्यक्तींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 
उमेश खंडू शिंदे (वय. 29, रा. संकल्प बांगला, इंद्रायणी नगर, तळेगाव दाभाडे ता. मावळ, मूळ गाव मलेवाडी ता. मिरज जि. सांगली) असे आत्महत्या केलेल्या जावयाचे नाव आहे.
 
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम. बी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश शिंदे यांचे गेल्यावर्षी विवाह झाला होता. ते तळेगाव एमआयडीसी तील मेघना कंपनीत “वेल्डर’चे काम करत होते. चार दिवसापूर्वी त्यांची पत्नी बाळंतपणासाठी सांगलीला गेली होती. सासरच्या व्यक्तीने जावयासह कार्यक्रमाचे तिकीट काढले होते. जावई उमेश शिंदे याने काम असल्याने कार्यक्रमाला येवू शकत नसल्याचे सांगताच सासरच्या सासू, सासरे, मेहुणी, मेहुणा यांनी लायकी काढून अपमानास्पद बोलल्याने तसेच अनेक वेळा अपमानास्पद बोलून मानसिक छळ करत होते.
 
शनिवारी (दि. 13) कार्यक्रमाच्या तिकिटावरून सासरच्या व्यक्तींकडून झालेल्या शाब्दिक अपमानातून जावई उमेश शिंदे याने राहत्या घरात आतून दरवाजा बंद करून विषारी औषधाच्या दोन बॉटल पिल्या. होणाऱ्या त्रासाने आरडाओरडा केल्याने शेजारी धावत आले. तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. डॉ. प्रवीण कानडे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
 
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सासू, सासरे, मेहुणी, मेहुणा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती