भाजपाचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले आहेत की, “मीदेखील बातमी वाचली आहे. व्हॅलेंटाइन डे काही दिवसांवर आला आहे. शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे. जुन्या प्रेमाला विसरायचं नसतं असं सगळे जण म्हणतात. वैभववाडीची परिस्थिती पाहिली तर येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारसुद्धा मिळणार नाही अशी शिवसेनेची परिस्थिती आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. बाळासाहेबांचा आम्ही काल आदर केला. आजही करतो आणि कायम करत राहू. आमच्या हृदयात बाळासाहेब आहेत. बाळासाहेबांच्या पक्षाची अवस्था अशी होऊ नये, अशी आमची भावना आहे. म्हणून हे सात नगरसेवक व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने उद्धवजींकडे पाठवतो आहे”.
“मेडिकल कॉलेजसाठी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना सहीसाठी फोन केला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आमच्या मेडिकल कॉलेजच्या फाईलवर त्यांनी सही केली. आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही. त्यांना काही दिलं तरी ते घेणार नाहीत. पुष्पगुच्छही स्वीकारणार नाहीत, म्हणून हे सात नगरसेवक आम्ही आभार मानण्यासाठी पाठवत आहोत. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने उद्धवजींना आणि शिवसेनेला मनापासून शुभेच्छा देतो,” असंही त्यांनी म्हटलं आहे.