सिंधुदुर्ग न्यायालयात आज भाजप आ. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. उद्या दुपारी ३ वाजता या प्रकरणाचा निकाल येणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांना अटक होणार की जामीन मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आज कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी नितेश राणे यांना अटक करणं का आवश्यक आहे हे कोर्टाच्या निदर्शनास आणलं. तसेच राणे हे कोर्टाला शरण आले आहेत. म्हणजे ते तांत्रिकदृष्ट्या कोर्टाच्या कस्टडीत असल्याने त्यांना कस्टडीतच पाठवलं पाहिजे. त्यांना बाहेर जाऊ देता कामा नये, असा युक्तिवादही घरत यांनी कोर्टासमोर केला. त्यामुळे उद्याचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
सिंधुदुर्ग न्यायालयात भाजप नेते नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. त्यानंतर विशेष सरकारी वकील यांनी मीडियाशी संवाद साधला. कोर्टाने दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. उद्या ३ वाजता या प्रकरणावर निकाल येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिले? दहा दिवसात राणेंना हजर राह्यला सांगितलं. ते हजर राहिले. काही तांत्रिक बाबी आहे. जामीन अर्ज मेटेंनेबल आहे का? त्यावर जामीन देता येईल का? आदी मुद्दे आम्ही मांडले. कोर्टाने सर्व बाजू ऐकल्या आहेत. आता उद्या ३ वाजता सर्वांना हजर राहायला सांगितलं आहे, असं घरत म्हणाले.
आरोपी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे न्यायालयासमोर हजर झाला म्हणजे तो कस्टडीत आला. त्यामुळे त्याला कस्टडीत घ्यायला हवं, अशी आमची मागणी होती. त्यावर उद्या योग्य ती ऑर्डर करू, असं कोर्टाने सांगितलं. आरोपीला कस्टडीत घेतलं तर त्याला कस्टडीत पाठवलं पाहिजे. त्याला कोर्टाच्या परवानगी शिवाय बाहेर जाण्याचा अधिकार नाही, असं आम्ही कोर्टाला सांगितलं. त्यावर कोर्टाने काहीच म्हटलं नाही. ते उद्या निर्णय देणार आहेत. त्यामुळे आज राणेंना जाऊ दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. संतोष परब हल्लाप्रकरणी कट कारस्थान कसं शिजलं? हल्ला का झाला? आरोपी म्हणतात ते कारण आहे का? की जिल्हा बँकेच्या निवडणुकांमुळे हल्ला झाला, की आणखी दुसरं काही कारण होतं का? यावर आमचा आजच्या युक्तिवादावेळी फोकस होता, असंही ते म्हणाले.