आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (11:28 IST)
रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आर्यन खानच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे.
 
त्यामुळे आर्यन खानला जामीन मिळणार की, कोठडीत वाढ होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 
जर जामीन फेटाळण्यात आला तर आर्यन खानला किमान 14 दिवस तुरुंगात जावे लागेल.
 
नार्केटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आर्यनसह इतर आरोपींना 11 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी कोर्टात केली होती. पण ती मागणी फेटाळण्यात आली आहे.
 
आतापर्यंत चौकशीदरम्यान एकूण 11 जणांना अटक केल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली.
 
सरकारी वकील कोर्टात म्हणाले, "आरोपींकडून अधिक माहिती मिळाली आहे. आर्यन खान आणि अरबाज यांच्याकडून अर्चित कुमार याचे नाव समोर आले. अर्चित सप्लायर असून त्याच्याकडून 6 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अर्चित गांजा नेटवर्कमध्ये सहभागी आहे."
 
मुंबई येथे एका क्रूझवर NCB ने 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री छापा टाकला होता. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला NCB ने ताब्यात घेतलं.
 
NDPS act 8C, 20 B, 27 आणि 35 या कलमांतर्गत आर्यन खानसह इतर 8 आरोपींना अटक करण्यात आली.
 
3 ऑक्टोबर रोजी आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. आरोपींकडे 13 ग्राम कोकेन, 5 MD मेथाडोन, 21 ग्राम चरस, 22 एकस्टेसीच्या गोळ्या आणि 1.33 लाख रुपयांची रोख सापडली असा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला.
 
आरोपी आणि ड्रग्सच्या रॅकेटमधील संबंध शोधण्यासाठी कस्टडी हवी आहे अशी मागणी यापूर्वी सरकारी वकिलांनी केली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती