प्रफुल्ल पटेलांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली

गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024 (09:05 IST)
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील तीन जागा भाजपला मिळणार आहेत, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. इतर तीन पक्षांनी यापूर्वीच आपले उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे अजित पवार गटाकडून कुणाला संधी दिली जाणार? याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. आता अखेर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल निवडून आल्यानंतर आपल्या आधीच्या सदस्यपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर मे महिन्यात पटेलांच्या आधीच्या टर्मसाठी पोटनिवडणूक होईल, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान, या पदासाठी पक्षातून अनेकजण इच्छूक होते. इतर कुणाला उमेदवारी दिली असती, तर पक्षात नाराजी पसरण्याची शक्यता होती, त्यामुळेच हा असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
 
महायुतीकडून आतापर्यंत राज्यसभेच्या 6 पैकी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. सहाव्या जागेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. सहाव्या जागेवर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे संकेत महायुतीच्या नेत्यांनी आधीच दिले आहेत. त्यामुळे महायुतीने सहाव्या जागेसाठी खरंच उमेदवार दिला तर लढत चुरशीची होईल. राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या देखील नावाची चर्चा होती. पण प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती