कर्कश्श आवाजाच्या डीजेला मनाई, शांतता कमिटी बैठक

गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024 (08:37 IST)
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या. दोन टॉप अन् दोन बेस लावूनच मिरवणुका काढा. डीजेला परवानगी नाही. आवाजाची मर्यादा ओलांडली गेल्यास आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी लागेल. याला आपण सूचना, विनंती, आदेश समजून घेऊन शांततेच्या मार्गाने शिवजयंती साजरी होण्यासाठी पोलिस सदैव आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना केली, पोलिस आयुक्तालयामध्ये मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अनुषंगाने मंगळवारी शांतता समिती सदस्य, सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
 
प्रस्तावनेत पोलिस उपआयुक्त डॉ. दीपाली काळे यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. १९ फेब्रुवारी रोजी मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजण्याबरोबरच सीसीटीव्ही कॅमे-यांची व्यवस्था करावी, मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याच्या दोन तृतीयांश भाग सोडावा, उत्सवाचे पावित्र्य राखावे देखावे आक्षेपार्ह नसावेत, ध्वनी प्रदूषणाच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे अशा सूचना देण्यात आल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती