मालेगावमधील पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

रविवार, 12 एप्रिल 2020 (12:38 IST)
मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख यांनी त्यांच्याकडील सर्विस रिव्हाँलवरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, एकीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कोरोना बाबत बैठक सुरु असताना पोलीस ठाण्याच्या आवारातच ही घटना घडल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
 
याबाबत अधिक माहिती अशी, मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढल्यामुळे चार दिवस मालेगाव लॉकडाऊन करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलिसांची रणनीतीबाबतची महत्वाची बैठक शहर पोलीस ठाण्याच्या आवारात सुरु होती. त्याचवेळी सायंकाळी साडेचारच्या सुमारास शहर पोलिस उपअधिक्षक रत्नाकर नवले यांचे वाचक असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख यांनी महिला समुपदेशन कार्यालयाच्या परिसरात एका झाडाखाली स्वत:च्या सर्विस रिव्हाँलवरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या शेख यांच्या आत्महत्येची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना मिळाली. यानंतर ताबडतोब बैठक सोडून बशीर शेख यांनी महिला समुपदेशन कार्यालयाकडे धाव घेतली असता सदरचा प्रकार समजला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती