अनुराधा आदिक यांची बदनामी केल्याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्याला एक कोटी अब्रुनुकसान भरपाई देण्याचे आदेश

सोमवार, 1 मे 2023 (07:57 IST)
अहमदनगर: श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यावरून सुरू असलेली राजकीय स्टंट बाजी भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. एका आंदोलनाच्या निमित्ताने श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांची बदनामी केल्याप्रकरणी भाजपचे पदाधिकारी प्रकाश चित्ते यांना १ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
 
श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालयाने हा आदेश दिला. चित्ते यांच्याविरोधात आदिक यांनी २०२१ मध्ये ५ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने हा आदेश दिला आहे. चित्ते यांनी आदिक यांची बदनामी केल्याचं सिद्ध होत असल्याने एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश विनय बी. कांबळे यांनी दिला आहे.
 
छत्रपती शिवाजी चौकात पुतळा बसवण्याच्या प्रकरणातून हा वाद निर्माण झाला होता. त्यावर्षीच्या शिवजयंतीला यावरून आंदोलन झाले होते. त्यामध्ये आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप पदाधिकारी प्रकाश चित्ते यांनी आदिक यांच्याविरोधात आरोप केले होते. पुतळ्याची जागा तत्कालीन नगराध्यक्ष आदिक यांच्याकडून बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चित्ते यांनी केला होता. त्यातून आपली बदनामी झाल्याचा दावा आदिक यांनी दाखल केला होता.
 
यानंतर शहरात सुरू केलेल्या बदनामी संदर्भात 2021 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी श्रीरामपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात पाच कोटींचा मानहाणीचा दावा दाखल केला होता. सदर खटल्यातील पुरावे आणि साक्षीदार तपासल्या नंतर श्रीरामपूर वरिष्ठ स्तर दिवाणी नाययलायने प्रकाश चित्ते यांनी आदिक यांची मानहानी केल्याचा निष्कर्ष काढत मानहानीपोटी आदिकांना एक कोटी रुपये देण्याचे आदेश दिल्याची माहिती अनुराधा आदिक यांचे वकील तुषार बी. आदिक यांनी दिली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती