ऑक्टानाईन इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स एलएलपी कंपनीने दरमहा ८ टक्के बोनस देण्याच्या नावाखाली रक्कम गोळा करून ६३ गुंतवणूकदारांना १ कोटी ८० लाख ३ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. त्यासंबंधीची रीतसर तक्रार गुंतवणूकदारांच्या वतीने पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे; परंतु पोलिसांच्या पातळीवर या फसवणुकीचा तपास फारसा गतीने होत नाही आणि पैसेही परत मिळेनासे झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
या कंपनीचे संचालक अभिजित ज्योती नागांवकर (रा. १७६७, राजारामपुरी, कोल्हापूर) आहेत. गुंतवणूक केलेल्या लोकांना कंपनीने १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर नोटरी करून पत्रे दिली आहेत. अनेकांनी किमान लाख रुपये व त्याहून जास्त रक्कम गुंतविली आहे. गुंतवलेली रक्कम कंपनीकडे १८ महिन्यांसाठी ठेव म्हणून ठेवण्यात येणार होती. गुंतवणूक करताना लोकांनीही या कंपन्या एवढा परतावा कसा देणार, याचा विचार केला नाही.