नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी, कोयता गँगची दहशत आणि सर्रास केले जाणारे प्राणघातक हल्ले या सर्वांना लगाम घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी नवा आदेश काढला आहे. त्यानुसार आता कोयता खरेदी करण्यासाठी आधार कार्ड दाखवावं लागणार आहे. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग आणि त्यांच्याकडून वापरले जाणारे कोयते याचा प्रभाव कमी करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एक नवीन नियमावली तयार केली आहे.
या संदर्भात नाशिक पोलिसांनी आदेश काढले असून वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कोयत्यासाठी 'आधारसक्ती केली आहे. त्यामुळे आता कोणत्याही ग्राहकाला आधार क्रमांकाशिवाय कोयत्यासह धारदार वस्तूची विक्री करता येणार नाही. जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्यांनाही हे नियम बंधनकारक असल्याची कठोर भूमिका पोलिसांनी घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी, व्यापारी पेठ, चौकात, शाळा-कॉलेज आवारात कोणीही हत्यारे बाळगणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. त्याअंतर्गत शहरातील कोयते विक्रेत्यांना आता कोयते खरेदी करणाऱ्यांची नोंद ठेवावी लागणार आहे. आधार कार्ड बघूनच त्यांना ग्राहकांना कोयते विकावे लागणार आहेत.
नाशिक शहरा मनाई आदेशान्वये या वस्तू फक्त जीवनावश्यक कामांसाठी विक्री करता येतील. त्यासाठी ग्राहकांची माहिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासह अंमलबजावणी करण्यास टाळटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधितांवर शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल होणार आहेत. कोणत्याही ठिकाणी कोणीही व्यक्ती कोयता व शस्त्र नियमांशिवाय विक्री करणार नाही. कृषी साहित्य, खाद्यपदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तूंखेरीज कोयता व शस्त्र विक्री करता येणार नाही. शस्त्र विक्री करताना खरेदीदाराचे नाव, मोबाइल क्रमांक, पत्ता, आधार क्रमांक नोंद करणे आवश्यक आहे. जीवनावश्यक प्रयोजनाकरता कोयता व शस्त्र विकणाऱ्यांनाही हे नियम बंधनकारक आहे, असे आदेशात म्हटले आहे.