दोन दिवसांपूर्वी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली. नाशिक जिल्हा रुग्णालयानंतर महत्वाचे असलेले संदर्भ रुग्णालय या निमित्तांने चर्चेत आले आहे. येथील हिवताप विभागात कार्यरत कर्मचाऱ्याकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा हिवताप अधिकारी संशयित वैशाली दगडू पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले होते.
दरम्यान संदर्भ रुग्णालयातील आरोग्य विभागाच्या अखत्यारित कार्यान्वित हिवताप विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकारी म्हणून वैशाली पाटील या नोकरी करत होत्या. त्यांनी तक्रारदार हे आजारी असलेल्या रजेच्या कालावधीतील मासिक वेतन काढून देण्याकरिता त्यांच्याकडे 10 हजारांची लाच सोमवारी मागितली. बुधवारी संशयित आरोग्यसेवक संजय रामू राव, कैलास गंगाधर शिंदे यांच्या मदतीने लाचेची रक्कम स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक साधना इंगळे यांच्या पथकातील हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, प्रकाश डोंगरे यांनी शिताफीने सापळा रचला.
बँक लॉकरमध्ये 71 तोळे सोने सापडले:
दरम्यान तिघा संशयित लाचखोर लोकसेवकांना पंचांसमक्ष लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले होते. या तिघा संशयितांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, पाटील यांच्या बँक लॉकरची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये 71 तोळे व घर- झडतीत 10 तोळे असे एकूण 81 तोळे इतके सोने आढळून आले. पथकाने हा सगळा मुद्देमाल जप्त केला आहे.