हा धरसोडपणा, नोटबंदीवर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

शनिवार, 20 मे 2023 (20:49 IST)
नाशिक : २ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला. यावर मनसे प्रमुखराज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन हा निर्णय झाला असता तर ही वेळ आली असती, असं राज ठाकरेंनी सांगितले. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 
 
राज ठाकरे पुढे म्हणाले की, आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे, परत तुम्ही नवीन नोटा आणणार, असं सरकार चालतं का? असे प्रयोग होतात का?, असा निशाणा राज ठाकरेंनी लगावला. त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या तेव्हा त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा एटीएममध्ये जात आहेत की नाहीत हे देखील पाहिलं नव्हतं. नोटबंदीसारखा निर्णय देशाला परवडणारे नसतात, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
 
त्र्यंबकेश्वरमधील १०० वर्ष जुनी परंपरा मोडू नका
त्र्यंबकेश्वरमधील वादावर राज ठाकरे म्हणाले की, वर्षानुवर्षांची परंपरा सुरू असेल तर ती थांबवण्यात काही अर्थ नाही. हा विषय तिथल्या संस्थानांचा आणि गावकऱ्यांचा आहे. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक मंदिर आहे किंवा अशा अनेक मशिदी आहेत. जिकडे तुम्हाला वर्षानुवर्षे तिथे हिंदु-मुसलमान यातील सख्य दिसून येते. माहिममधील महदूम बाबाचा दर्गा आहे तिकडे त्या उरजावर जी चादर चढवली जाते ती माहिम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल ती चादर चढवतो आणि अशी अनेक उदाहरणे माझ्याकडे दोनदिवसांपूर्वी महाराष्ट्रातील आली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही त्या गोष्टी चालू ठेवल्या पाहिजेत. इतर धर्माचा एखादा माणूस आपल्या मंदिरात आला तर इतका कमकुवत होणारा धर्म आहे का? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
याआधी मी अनेक दर्गामध्ये, मशिदीमध्ये गेलो आहे. अनेक मुसलमान लोकं ज्या वेळेला मंदिरामध्ये येतात. उलट आपल्याच काही मंदिरामध्ये आपल्या जातीलाच गाभाऱ्यात दर्शन दिले जाते. त्यामुळे मला असं वाटतं की, माणसाची या गोष्टीकडे बघण्याची वृत्ती जी आहे कोणती आहे ती छोटी आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी या गोष्टीचा निर्णय घ्यावा. इतरांनी यात पडायची काही गरज नाही. असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराबद्दल आपले मत व्यक्त करणाऱ्या राजकीय नेत्यांवर केला.
 
त्र्यंबकेश्वरमधील वादानंतर हिंदु महासंघाने गोमूत्र शिंपडले, यावर बोलताना राजय ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला की, या वादात कोणाला दंगली हव्यात का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील तिकडे प्रहार करणे गरजेचे आहे. ज्या वेळेला मी भोंग्याचा विषय काढला किंवा माहिमच्या समुद्रातील अनधिकृत दर्गाबद्दल मी जेव्हा बोललो. तुम्हाला ज्या गोष्टी दिसत आहेत, त्यावर बोलायलाच पाहिजे. आमच्या गडकिल्यांवर जे दर्गे उभे आहेत ते हटवलेच पाहिजे. काय संबंध त्याचा महाराजांच्या गडकिल्यांवर ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर मी अनिकृत मशिदी बद्दल कलेक्टरसोबत बोलल्यावर ती तोडली गेली. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्यावर तुम्ही प्रहार केलाच पाहिजे. पण जाणूनबुजून काहीतरी खोदून काढायचं याला काही अर्थ नाही, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती