मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली हे त्याच क्षणी कळालं अशा शब्दात १९९९ मध्ये घडलेला किस्सा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितला. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात उपस्थित असलेले राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
राज ठाकरे म्हणाले की, १९९९ ची निवडणूक झाली. गोपीनाथ मुंडे होते. काही कारणास्तव मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपा युती सरकार अडलं होतं. स्वाक्षरी होत नव्हती. दुपारची ३.३० ची वेळ होती. मातोश्रीवर २ गाड्या लागल्या. त्यातून प्रकाश जावडेकर आणि २-३ भाजपा नेते बाहेर आले. आम्ही बाळासाहेबांना भेटण्यासाठी आलो आहोत असं त्यांनी मला सांगितले. मी म्हटलं साहेब झोपलेत. उठल्यावर भेटा, मात्र अर्जंट आहे. त्यावर बाळासाहेब भेटणार नाहीत असं मी म्हटलं. तेव्हा आज आपलं सरकार बसतंय. सुरेश जैन युतीचे मुख्यमंत्री असतील हे ठरलं आहे बाळासाहेबांच्या कानावर हे घालायचं आहे असा निरोप त्यांनी दिला.
त्यानंतर मी हा निरोप देण्यासाठी वरच्या रुममध्ये गेलो. काका झोपले होते. त्यांना दोन-तीनदा आवाज देऊन उठवले. निरोप दिला. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचंय आणि ते आमदार खेचून आणतील असा निरोप मी दिला. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, त्यांना सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल दुसरा कुणी बसणार नाही. हे सांगून बाळासाहेब परत झोपले. मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली हे त्याच क्षणी कळालं. मराठीसाठी, हिंदुत्वासाठी कडवटपणा बाळासाहेबांमध्ये होता असं राज ठाकरेंनी सांगितले.