इगतपुरीतील रिसॉर्टवर पोलिसांचा मध्यरात्री छापा; हुक्का पार्टीतील तब्बल ७० जण ताब्यात

सोमवार, 14 मार्च 2022 (07:22 IST)
नाशिकचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील हे जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. त्यामुळेच इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी येथे एका रिसॉर्टवर मध्यरात्री छापा टाकण्यात आला आहे. याठिकाणी हुक्का पार्टी सुरू असल्याचे आढळून आले. तसेच, तेथे उपस्थित असलेल्या महिला व पुरुष अशा एकूण ७० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाली. त्रिंगलवाडी येथील हॉटेल माउंटन शाडो रिसॉर्ट येथे हुक्का पार्टी सुरू असून त्यात महिला व पुरुषांची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पाटील यांनी विशेष पथक तयार केले. या पथकाने मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास रिसॉर्टवर छापा टाकला. या हुक्का पार्टीमध्ये ६० ते ७० जण सहभागी होते. त्यात २५ ते ३० महिला आणि अन्य पुरुषांचा सहभाग होता. या सर्व जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी इगतपुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीही इगतपुरीतील रेव्ह पार्टी, हुक्का पार्टी आणि अन्य पार्ट्या होत असल्याचे निदर्शनास आले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये तरुणांचे प्रमाण मोठे असल्याचे सांगितले जात आहे. इगतपुरी तालुक्यातील विविध रिसॉर्टमध्ये हायप्रोफाईल पार्ट्या सातत्याने होत आहेत. याबाबत ग्रामीण पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र, तरीही या पार्ट्यांचे आयोजन थांबलेले नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती