मनोहर जोशींनी बाळासाहेब ठाकरेंच्या एका ओळीच्या आदेशावर मुख्यमंत्रीपद सोडलं होतं
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (09:01 IST)
(महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज, 23 फेब्रुवारी, पहाटे निधन झालं. त्यांच्याशी संबंधित हा आठवणपर लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)
1999 च्या जानेवारीचा शेवटचा आठवडा... शिवसेना-भाजपा युतीचं सरकार.... 'वर्षा' आणि 'मातोश्री' बंगल्यांमधला तणाव अगदी टोकाला गेलेला.
वर्षा बंगल्यातल्या मुख्यमंत्र्यांना 'मातोश्री'मध्ये राहाणाऱ्या साहेबांकडून एक मोजक्या शब्दांतला संदेश आला आणि मनोहर जोशी यांनी आपलं पद सोडलं....
वरवर गिरीश व्यास प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला, असं चित्र उभं राहिलं तरी दोन्ही सत्ताकेंद्रांत त्याआधीपासून संघर्ष होत होताच. त्यातलं एक केंद्र होतं मुख्यमंत्र्यांचं आणि दुसरं होतं त्यांच्या पक्षप्रमुखांचं.
साधारणतः प्रादेशिक पक्षांमध्ये एखाद्या राज्याची सत्ता आली की त्या पक्षाचे प्रमुखच मुख्यमंत्री होतात. पण महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचं सरकार 1995 साली आल्यावर असं झालं नाही.
युतीतला तेव्हा जास्त संख्याबळ असणारा पक्षाच्या म्हणजे शिवसेनेच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री होण्याऐवजी ते पद दुसऱ्या नेत्याला द्यायचं ठरवलं.
मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या दोन नेत्यांपैकी हा मान मनोहर जोशी यांना मिळाला. उपमुख्यमंत्रिपदी भाजपाचे गोपिनाथ मुंडे आले. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी उघडपणे सरकारचे 'रिमोट कंट्रोल' होण्याचा निर्णय घेतला.
शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला.
सोशल मीडियावर येऊन राजीनामा देणारे कदाचित ते पहिलेच मुख्यमंत्री असावेत. याच पार्श्वभूमीवर सेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कशाप्रकारे राजीनामा दिला होता ते पाहू.
मनोहर जोशी यांना जावई गिरीश व्यास यांच्या मदतीसाठी भूखंडाचं आरक्षण बदलल्याच्या आरोपामुळे पद सोडावं लागलं होतं.
आहे मनोहर तरी गमते उदास
1995 साली विधानसभेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीला सरकार स्थापन करता आलं.
शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधीत राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
सेना भाजपाच्या नेता निवडीच्या आदल्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी, "मला ऊठ म्हटलं की उठणारा आणि बस म्हटलं की बसणारा मुख्यमंत्री हवा आहे! मुख्यमंत्री कोणीही होवो, सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याच हाती राहाणार आहे!"
त्यामुळे महाराष्ट्रात दोन सत्ताकेंद्रं तयार होणार आणि या केंद्रांमध्ये वादाच्या ठिणग्या उडत राहाणार याचे संकेत मिळाले होते.
मनोहर जोशी यांनी अंतर्गत स्पर्धेतून मुख्यमंत्रीपद मिळवलं असलं तरी त्यांची पुढची वाटचाल तितकी सोपी नव्हती.
एकाबाजूला युतीचं सरकार, दुसरीकडे निवडणुकीत दिलेली आव्हानात्मक आश्वासनं पूर्ण करणं आणि शिवसेनाप्रमुखांच्या अपेक्षा पूर्ण करणं अशी तिहेरी जबाबदारी त्यांच्याकडे होती.
युतीमधल्या भाजपालाही त्यांना सांभाळायचं होतं. शिवसेनाप्रमुखांशी त्यांचे अधूनमधून वादाचे प्रसंग उद्भवू लागले.
'जय महाराष्ट्र, हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' या पुस्तकामध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी दोघांमधील तणावाच्या प्रसंगाची तपशीलवार माहिती दिली आहे.
एन्रॉनच्या बैठकीचा वाद
दाभोळमधील वीज प्रकल्पाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं दशक ढवळून काढलं. त्याचा राजकीय मुद्दा झालाच तर तो प्रकल्प रद्द करू असं युतीने आपल्या प्रचारसभांमध्ये सांगितलं होतं.
या मुद्द्यांवर घडलेली एक घटना शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री यांच्यातील वादाची ठिणगी ठरली.
युतीचे सरकार आल्यावर एन्रॉन अरबी समुद्रात बुडवला जाऊ नये म्हणून त्या कंपनीच्या भारतातील प्रमुख रिबेका मार्क मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भेटायला येणार होत्या.
मात्र, त्या उशिरा आल्यामुळे मुख्यमंत्री जोशींनी संतापून ती बैठकच रद्द केली. वास्तविक रिबेका मार्क त्याचवेळेस मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करत होत्या.
या वादाचं वर्णन करताना प्रकाश अकोलकर लिहितात, "या घटनेतून विपरित अर्थ काढण्यात आला. रिबेका मार्क ठाकरे यांना भेटल्या म्हणून मनोहर जोशी संतापले अशा रितीने सारी कहाणी ठाकरे यांच्यापुढे सादर करण्यात आली. त्यातून मोठं वादळ निर्माण झालं."
जयदेव यांच्या इमारतीत छापा
बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे सांताक्रूझला राहात होते. जयदेव राहात असलेल्या इमारतीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आश्रय दिल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या इमारतीवर छापा टाकला.
आपलं सरकार, आपले मुख्यमंत्री, आपणच रिमोट कंट्रोल असताना असं घडणं शिवसेनाप्रमुखांना त्रासदायक वाटलं असणार. परंतु त्यावेळेस मुख्यमंत्री मुंबईबाहेर असल्यामुळे ते यातून बाहेर पडू शकले.
मुख्य सचिव शरद उपासनी यांच्या जागी दिनेश अफजलपूरकर यांचीच नेमणूक व्हावी यासाठी शिवसेनाप्रमुख प्रयत्नशील होते असं अकोलकर लिहितात. अशाप्रकारचे अनेक तणावाचे प्रसंग दोघांमध्ये उभे राहिले.
अनेकदा मुख्यमंत्री बदलले जाणार अशी चर्चा व्हायची. मग दोन्ही नेत्यांची मातोश्रीवर चर्चा व्हायची आणि वादावर पडदा पडायचा. म्हणजेच मनोहर जोशी यांना मिळालेल्या चार वर्षांच्या काळात ही स्थिती कायम राहिली होती.
याच काळात रमेश किणी मृत्यू प्रकरण, अणा हजारे यांच्या आंदोलन, मंत्री शशिकांत सुतार यांना राजीनामा द्यावं लागणं, नैसर्गिक संकटं अशा अनेक वादळांचा मनोहर जोशी यांना 'सामना' करावा लागला.
जानेवारीच्या 1999च्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांनी बहिष्कार टाकला होता.
भूखंडाचं आरक्षण बदललं
या सगळ्या धामधूमीत 1998 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यातील एका भूखंडाचं प्रकरण न्यायालयासमोर आलं.
मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे जामात गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील शाळेसाठी आरक्षण असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेला आता निर्णायक वळण मिळालं होतं.
मनोहर जोशी यांना आधी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडे राजीनामा देऊनच मला भेटायला या, असा निरोप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठवला आणि मुख्यमंत्री बदलण्यात आले.
'जर जोशीला काढून तुला मुख्यमंत्री बनवला तर...'
मनोहर जोशी यांच्यानंतर शिवसेनेचे नारायण राणे युती सरकारचे दुसरे मुख्यमंत्री झाले. नारायण राणे यांनी आपल्या 'नो होल्ड्स बार्ड' या पुस्तकात मनोहर जोशी यांच्या राजीनाम्याआधीच्या काळाचं वर्णन केलं आहे.
'मनोहर जोशी स्वतःला वेगळं सत्ताकेंद्र मानत आहेत' अशी भावना साहेबांच्या मनात निर्माण झाल्याचं आपल्या लक्षात आलं असं राणे लिहितात. (या पुस्तकाच्या प्रियम गांधी-मोदी सहलेखिका आहेत)
'1995-1997 या काळात साहेबांनी जोशींच्या नेतृत्वातील सरकारमधील गरज नसलेल्या लालफितशाहीवर सामनातून टीका केली होती. 1998 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या जागा 33 वरुन 10 वर आल्यावर युतीचे सरकार टिकण्यासाठी जोशीजींना पदावरुन काढणे गरजेचे असल्याचं त्यांना वाटू लागलं', असं राणे यांनी लिहिलं आहे.
राणे पुस्तकात सांगतात, "एका रात्री बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला मातोश्रीवर बोलावून घेतले. तेथे उद्धवजीही उपस्थित होते. तेव्हा साहेब स्पष्टपणे म्हणाले, जर जोशीला काढून तुला मुख्यमंत्री बनवला तर तू सरकार चालवणार का?
मी म्हणालो, साहेब फक्त चालवणार नाही, दौडवणार."
राणे पुढं लिहितात, दुसऱ्या दिवशीही साहेबांनी हाच प्रश्न विचारला. तेव्हा मी त्यांना म्हणालो, तुम्ही नेहमी जोशीजींच्या जागी मला घेण्याचं बोलता पण कधीही शेवटचा निर्णय घेत नाही असं का? तेव्हा त्यांनी आपले सचिव आशीष कुलकर्णी यांना बोलावून पत्राचा मजकूर सांगितला.
ते पत्र असे होते. (नारायण राणे यांनी पुस्तकात लिहिलेल्या पत्राचा मराठी अनुवाद येथे देत आहोत.)
श्री. मनोहर जोशी.
मा. मुख्यमंत्री
महाराष्ट्र
प्रिय मुख्यमंत्री,
तुम्ही आता जेथेही असाल तेथे, कृपया सर्वकाही थांबवा आणि तात्काळ महाराष्ट्राच्या सन्माननीय राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द करा. कृपया त्यानंतर मला भेटायला या. कृपया मला भेटायला येण्यापूर्वी तुम्ही राजीनामा दिला असल्याची खात्री करा.
आपला सादर,
बाळ ठाकरे
'निर्णयांवर ठाम पण पक्षशिस्त पाळणारे'
मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे शिवसेनाप्रमुखांशी कसे संबंध राहिले याबद्दल ज्येष्ठ पत्रकार महेश विजापूरकर यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.
विजापूरकर म्हणाले, "मनोहर जोशी सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेत असल्यामुळे त्यांना शिवसेनाप्रमुख आणि पक्षाचा स्वभाव परिचित होता. मुख्यमंत्री झाल्यावरही ते अनेकदा पक्षप्रमुखांना भेटत असत. त्यांनी पर्यायी किंवा समांतर सत्ताकेंद्र तयार होण्यासाठी कधीही प्रयत्न केल्याचं मला जाणवलं नाही, फक्त घटनात्मक पदावर नेमणूक झाल्यावर त्या पदाचा सन्मान राखला जावा अशी त्यांची अपेक्षा निश्चित होती.
"युतीची सत्ता आल्यावर थोड्याच काळात शिवसेनाप्रमुखांनी बांगलादेशी लोकांना शोधण्याचे आदेश दिले, मात्र मुख्यमंत्रीपदासारख्या जबाबदार पदावर बसलेल्या मनोहर जोशी यांनी त्यासाठी योग्य कायदेशीर मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे अशी भूमिका घेतली. त्यानंतर एन्रॉनच्या रिबेका मार्क आपण मंत्रालयात वाट पाहात असूनही आधी मातोश्रीवर जाणं त्यांना घटनात्मक पदाचा अवमान करणारं वाटलं. मनोहर जोशी पक्षाची शिस्तही पाळायचे आणि मुख्यमंत्री म्हणून आपल्या निर्णयावर ठामही असायचे."
महेश विजापूरकर यांच्याप्रमाणेच ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनीही याबद्दल आपले मत सांगितले. ते म्हणाले, मनोहर जोशी यांना आपल्या पदाचा सन्मान राहावा असं वाटायचं. ते मुख्यमंत्री झाल्यावर खरी सत्ता त्यांच्या हातात गेली. सर्व कामांसाठी लोक त्यांच्याकडे जाऊ लागले. नेता कोण असेल हे ठरवण्याचा अधिकार जरी शिवसेनाप्रमुखांकडे असला तरी सत्ता चालवण्याचा अधिकार त्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडे गेला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये वाद होणं साहजिक होतं."
'बाळासाहेबांचे माझ्यावर प्रेम होते म्हणूनच....'
बाळासाहेबांच्या निधनानंतर एका दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांना व्यासपीठ सोडू जावं लागलं होतं. याबद्दल लोकसत्तेच्या आयडिया एक्सचेंज कार्यक्रमात जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यात त्यांनी आपलं मुख्यमंत्रिपद गेलं तेव्हा काय वाटलं होतं, हे सुद्धा सांगितलं होतं.
ते म्हणाले होते,"1999 साली अशाच एका गैरसमजातून मुख्यमंत्रीपद गेले. माझ्या जागी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे. बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केले तेव्हा का केले असे विचारले नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले तेव्हा तात्काळ राजीनामा दिला.
"1995 साली मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलो होतो. साहेबांनी मला पसंती दिली. प्रेयसीला आपण विचारतो का, माझ्यावरच का प्रेम केले? बाळासाहेबांचे माझ्यावर नितांत प्रेम होते म्हणूनच शिवसेनेतील सर्व पदे मला मिळाली. उद्धव यांचेही माझ्यावर प्रेम आहे. तथापि वडील आणि मुलाच्या प्रेमाच्या पद्धतीत फरक असू शकतो तसेच कम्युनिकेशन गॅपही असू शकते. त्यामुळेच दसरा मेळाव्यातही गैरसमजाचा फटका बसल्यानंतरही मी सारे काही माफ करू शकलो."