सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते : अनिल देशमुख

सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (21:35 IST)
“शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपाच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची शक्यता वाटल्याने मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. लता मंगेशकर आमचे दैवत आहेत.” असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलाताना सांगितलं.
 
तसेच, “सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशातील जनता मानत असल्याने त्यांच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही. या ट्विट प्रकरणात भाजपाच्या आयटी सेलचा प्रमुख आणि इतर १२ इन्फ्लुएन्सरचा समावेश असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलीस कार्यवाही करत आहेत.” असं देखील यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.
 
याआधी शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केलं आणि देशभरात एकच चर्चा सुरु झाली. यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसं होऊ देऊ नका असं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी काही सेलिब्रिटींचं ट्विट हे समान असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं .

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती