होम क्वारंटाईनसाठी कुटुंबियांची लेखी हमी व फॅमिली डॉक्टरशी चर्चा आवश्यक

शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (11:17 IST)
होम क्वारंटाईन असलेले कोरोना बाधित रुग्ण अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून आले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने आता कडक नियम लागू केले आहेत. त्यानुसार कोरोना बाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांनाही लेखी हमी व त्यांच्या फॅमिली डॉक्टरशी चर्चा केल्यानंतरच त्यांना होम क्वारंटाईन होण्याची परवानगी दिली जाणार आहे. 
 
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यात लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ८० टक्के आहे. या रुग्णांना होम क्वारंटाईन होण्याची परवानगी महापालिकेने दिली आहे. परंतु, नियमानुसार १४ दिवस घरातच रहाण्याऐवजी काही रुग्ण बाहेर फिरत असल्याचे समोर आले आहे. अशा काही रुग्णांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने आता सुधारित नियमावली आणली आहे. 
 
त्यानुसार कोरोना बाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच दिवशी होम क्वारंटाइनची प्रक्रिया संबधित विभाग कार्यालयाने पूर्ण करावी. तसेच वॉर रुममार्फत रुग्णांची नियमित विचारपूस करणेही बंधनकारक असेल. त्याच बरोबर प्रत्येक विभागातील समर्पित वैद्यकिय पथकाने होम क्वारंटाइन असलेल्या किमान दहा टक्के व्यक्तींच्या घरी रोज भेट देणे आवश्‍यक करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती