उष्णतेच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना पूर्वमोसमी पावसाने दिलासा मिळाल्यानंतर चातकासारखी वाट पाहणाऱ्या नागरिकांना नैऋत्य मोसमी पावसाने अजूनही हुलकावणी दिली आहे. राज्यात १० जूनला मॉन्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते. आता निम्म्या महाराष्ट्रात मोसमी पाऊस व्यापला आहे. परंतु गेल्या पंधरवड्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने पाऊस नेमका गेला कुठे हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अनेक भागात हंगामाची सुरुवात कोरडी झाल्याने खरिपाच्या पेरण्यांबाबत शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
उन्हाळ्याच्या मार्च ते मे या महिन्यांदरम्यान पूर्वमोसमी पाऊस कोसळला नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यात अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठा घटला आहे. त्यात मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर मुसळधार पावसाची आशा व्यक्त करण्यात आली होती परंतु जून महिन्याची १६ तारीख उलटली तरी पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
दक्षिण कोकणात मोसमी पावसाचे १० जूनला आगमन झाले. १३ जूनपर्यंत मुंबई-पुण्यापर्यंत मोसमी वारे पोहोचले. १३ जूनला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने प्रवेश केला. राज्यातील सर्वच भागात मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या महिन्याच्या पंधरवड्यात ५७ टक्के पाऊस कमी झाला आहे. २४ जिल्ह्यांमध्ये ५० ते ८० टक्के कमी पाऊस झाला आहे.
राज्यात पूर्वमोसमी पाऊस कमी झाल्यामुळे मोसमी पावसासाठी आवश्यक पोषक वातावरण तयार झाले नाही. समुद्रातील बाष्पयुक्त वारे जमिनीकडे वाहतात. त्यासाठी आवश्यक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे समुद्रातील बाष्प येण्यास अडचणी येत आहेत. त्याचा परिणाम पावसावर होत असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मोसमी पावसाने अर्धा महाराष्ट्र व्यापला असून, पुढील काही दिवसात राज्याच्या काही भागातच मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन तीन दिवसात मोसमी पाऊस विदर्भात प्रवेश करेल. जूनच्या अखेरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची सरासरी कमीच राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.