'तौकते' चक्रीवादळ पोरबंदरला खेटून पुढे सरकण्याची शक्यता, गुजरात आणि कोकणमध्ये सतर्कतेचे आदेश

शनिवार, 15 मे 2021 (16:03 IST)
तौकते चक्रीवादळ पुढच्या 12 तासांमध्ये तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यापुढच्या 12 तासांमध्ये हे वादळ अधिक तीव्र होईल. 18 मेच्या दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत गुजरातच्या पोरबंदर जवळून हे वादळ जाण्याचा अंदाज आहे.
 
हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून यांची माहिती दिली आहे.
या वादळामुळे केरळच्या किनारपट्टी भागात समुद्राला उधाण आलं आहे. जोरदार पावसासह समुद्राचं पाणी नागरी भागामध्ये घुसलं.
 
वादळ गोव्यापासून 350 किलोमीटर अंतरावर
या वादळा विषयीची अधिक माहिती देताना प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी सांगितलं,
 
"गोवा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात याचा सर्वाxत जास्त प्रभाव असेल दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
 
तसंच काहीवेळा वार्‍यांचा वेग ताशी 90 किलोमीटर पर्यंत जाण्याची शक्यता आहे. यानंतर उत्तर कोकण म्हणजेच रायगड मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना 16 आणि 17 तारखांना मध्यम किंवा एखाद-दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल. पण वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटर असण्याची शक्यता आहे.
 
ताशी नऊ किलोमीटर वेगाने पुढे सरकणारं हे वादळ पणजी पासून 350 किलोमीटर दूर आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनार्‍यापासूनही ते तितकच दूर राहण्याचा अंदाज आहे."
 
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी आणि यंत्रणांना सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज राहावं आणि मनुष्यबळ तसंच्या साधन सामुग्री तयार ठेवावी असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज (शनिवार) विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
हे वादळ मुंबईच्या जवळ येण्याची शक्यता असल्याने मुंबईत पुढील 2 दिवस मोठ्या प्रमाणात खबरदारी बाळगण्यात येत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दोन दिवस लसीकरणही बंद ठेवण्यात आलं आहे.
 
पण या तौकते वादळामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर शुक्रवार रात्रीपासून जोरदार वारे वहायला सुरुवात झालेली आहे.
 
18 मे च्या पहाटे हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे.
 
केरळच्या किनारपट्टीला शुक्रवारी जोरदार लाटा आणि पावसाने झोडपून काढलंय. तर गोव्यामध्येही रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला.
या तौकते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही कोकण किनारपट्टीमध्ये पावसाची शक्यता आहे.
 
या वादळाचा धोका लक्षात घेता, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे. वादळ कोकण किनारपट्टीच्या जवळून जाणार असल्याने जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
 
यासोबतच मच्छीमारांनी बोटींचं नुकसान होऊ नये म्हणून त्या नीट बांधून ठेवाव्यात, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
कोस्टगार्डने 3 जणांना वाचवले
केरळच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या एका बोटीचा आपात्कालीन संदेश कोस्टगार्डला मिळाला. या बोटीचं इंजिन बंद पडलं होतं. तसंच ही बोट चक्रीवादळात अडकली होती.
 
पण हा संदेश मिळताच कोस्टगार्डच्या विक्रम जहाजाने त्यांची मदत केली आणि 3 जणांचे जीव वाचवले. 14 मे म्हणजेच शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.
मुंबईत खबरदारीच्या उपाययोजना
या कालावधीत मुंबई आणि परिसरात वेगवान वाऱ्यांसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधीत यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत.
 
पुढील 2 दिवस मुंबईतील लसीकरण बंद राहील, अशी माहितीही मुंबई महापालिकेने दिली आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवावं तसंच आवश्यक ती दक्षता बाळगावी, समुद्रकिनारी जाणं टाळावं, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलं आहे.
 
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काय सूचना दिल्या आहेत?
1) मुंबईतील विविध भागात जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहेत. या परिसरातील धोकादायक ठरू शकणाऱ्या 384 वृक्षांची छाटणी करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर ठिकाणच्या धोकादायक झाडांचीही छाटणी करण्यात येत आहे.
2) पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. त्याचबरोबर विभागातील तात्पुरत्या निवाऱ्याची ठिकाणे स्वच्छ करुन सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.
3) पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी उदंचन संचांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून सदर ठिकाणी 'रिफ्लेक्टीव्ह जॅकेट' परिधान केलेल्या कामगारांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांवर साचलेला कचरा स्वच्छ करण्यात येत आहे.
 
4) वेगाने वारे वाहण्याची शक्यता आणि पर्जन्यवृष्टीची संभाव्यता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 6 चौपाट्यांवर पूरबचाव पथके तैनात करण्याचे निर्देश मुंबई अग्निशमन दलास देण्यात आले आहेत. या सर्व चौपाट्यांवर नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
 
5) आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून या यंत्रणेस हवामान खात्याकडून प्राप्त अंदाज आणि चक्रीवादळाबाबतच्या सूचना, सतर्कतेचे संदेश सर्व संबंधितांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नौदल, तटरक्षक दल, थलसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांची मदत आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याची कार्यवाही देखील आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे.
 
6) वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालय क्षेत्रातील जनित्र आणि इतर आवश्यक ती पर्यायी व्यवस्था सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करुन घ्यावी. तसेच आवश्यक ती इंधन उपलब्धता देखील करवून घ्यावी, जेणेकरुन रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, अशाही सूचना देण्यात येत आहेत.
 
यंदाच्या मोसमातलं हे या परिसरातलं पहिलं चक्रीवादळ आहे. त्याला 'तौकते' हे नाव देण्यात आलंय. म्यानमारने सुचवलेलं हे नाव आहे. तौकतेचा अर्थ सरडा असा होतो. चक्रीवादळांची नावं कशी ठरवली जातात, याविषयीचं सविस्तर वृत्त तुम्ही बीबीसी न्यूज मराठीच्या वेबसाईटवर वाचू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती