नागपूर पेंच व्याघ्र प्रकल्पात नवीन वर्षात बोट सफारी सुरू होणार

सोमवार, 30 डिसेंबर 2024 (10:51 IST)
नागपुरात पेंच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे. या जंगल सफारीसाठी देश परदेशातून पर्यटक निसर्गाच्या सानिध्यासाठी येतात. 
जंगलातील जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वाघ, बिबट्या, हरिण, नीलगाय, रेनडिअर, कोल्हा इत्यादी वन्यजीव पाहायला मिळतात. 

येत्या नवीन वर्षात देखील पर्यटकांना या जंगल सफारीचा आनंद घेता येणार आहे. वनविभागाकडून पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी पर्यटकांना आता बोटिंगचा आनंद देखील घेता येणार आहे. नवीन वर्षात बोटिंग सफारी सुरु होण्याचे संकेत मिळाले आहे. या साठी महाराष्ट्र इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डा मार्फ़त (MEDB)  पर्यटनासाठी अडीच कोटी रुपयांची सर्वसमावेशक योजना शासनाकडे सादर करण्यात आली आहे. 

बोटींग सफारी अंतर्गत 1.5 कोटी रुपये खर्चून 2 प्रदूषणविरहित विद्युत बोटी पेंचमध्ये आणल्या जाणार आहेत. बोटींग सफारीचा उद्देश बोट सफारीला एक प्रमुख पर्यटन आकर्षण म्हणून प्रोत्साहन देणे आणि स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे.

सौरऊर्जेवर चालणाऱ्या 2 बोटी, प्रति बोट दररोज 2 सहली अशा एकूण 4 सहली केल्या जाणार आहेत. सकाळी व दुपारी कोलितमारा ते नवेगाव खैरी मार्गे कुवरा भिवसेन या सुमारे २३ किमी लांबीच्या मार्गावर पर्यटक जल पर्यटनाचा आनंद लुटतील. यास सुमारे 2.5 तास लागतील.
 
एका बोटीत 24 पर्यटक बसू शकतात. याअंतर्गत दररोज एकूण 96 पर्यटकांना बोटिंग सफारीचा आनंद घेता येणार आहे. बोटिंग सफारीसाठी प्रति पर्यटक 1,500 रुपये तिकीट शुल्क आकारले जाईल. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती