नागपूर महापालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत असलेल्या मालमत्ता करातून 2024-25 या आर्थिक वर्षात 350 कोटी रुपये प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. निर्धारित उद्दिष्टपूर्तीसाठी नागपूर महानगरपालिकेने ऑनलाइन कर भरण्यावर 10 टक्के सवलत जाहीर केली, तर ऑफलाइन पद्धतीने कर भरल्यास केवळ 5 टक्के सवलत दिली जाणार होती.
कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची लोकांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि वसुलीचे उद्दिष्ट गाठता यावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली. मात्र, आता या योजनेचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. या घोषणेनुसार आता 31 डिसेंबरपर्यंत कर भरला तरच या सवलतीचा लाभ मिळणार असून, त्यानंतर कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेने मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्याचे कर विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी सांगितले. मालमत्तांवर किती कर थकबाकी आहे? त्याची माहिती ऑनलाइन पद्धतीनेही उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे कर भरण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आता या योजनेचे अवघे 15 दिवस उरले आहेत. त्यामुळे अधिकाधिक मालमत्ताधारकांनी त्याचा लाभ घ्यावा.