नाशिकमध्ये ‘या’ ठिकाणी ड्रोन उडविण्यास बंदी; पोलिसांनी काढले आदेश

मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (08:41 IST)
नाशिक शहरातील संवेदनशील लष्करी व महत्त्वाच्या इमारतींच्या परिसरात नो ड्रोन फ्लाय झोन पुन्हा एकदा पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी लागू केला आहे. याबाबतचा आदेश येत्या दि. 30 ऑक्टोबरपर्यंत लागू राहील.
नाशिकच्या पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात महत्त्वाच्या आस्थापनांच्या ठिकाणी बेकायदेशीररीत्या ड्रोन उड्डाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

या पार्श्‍वभूमीवर देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरी, नाशिकरोड येथील सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस, मध्यवर्ती कारागृह, एकलहरा थर्मल पॉवर स्टेशन, गांधीनगर येथील शासकीय मुद्रणालय, पंचवटीतील प्रसिद्ध काळाराम मंदिर, बोरगड व देवळाली येथील एअरफोर्स स्टेशन, उपनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल, नाशिक येथील सीबीएसजवळील किशोर सुधारालय, त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्र, पोलीस मुख्यालय व पोलीस आयुक्त कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय, तसेच नाशिकरोड व देवळाली कॅम्प येथील रेल्वे स्टेशन व महापालिकेचे सातपूर येथील व विल्होळी येथील मनपा जलशुद्धीकरण केंद्र अशा 16 महत्त्वपूर्ण व संवेदनशील केंद्रांवर व आस्थापनांवर ड्रोन उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

मात्र हा आदेश शासकीय, निमशासकीय, लष्करी दलांच्या स्वमालकीच्या ड्रोनसाठी लागू राहणार नाही. खासगी व्यक्तींनी ड्रोन उड्डाणापूर्वी आयुक्तालयाची लेखी परवानगी घेऊन वापरानंतर संबंधित ड्रोन आपापल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक आहे.

काही कारणांस्तव ड्रोन उड्डाण करावयाचे असल्यास संबंधितांनी आपापल्या हद्दीतील पोलीस स्टेशनशी परवानगीसाठी संपर्क साधावा आणि वापरानंतर ड्रोन जमा करावेत, असे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती