पुण्यात ससून हॉस्पिटलच्या ICU मध्ये उंदराने चावलेल्या रुग्णाचा मृत्यू

बुधवार, 3 एप्रिल 2024 (12:18 IST)
पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडणारे पुण्याचे ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ससूनच्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल असलेल्या एका तरुणाचा उंदीर चावल्याने मृत्यू झाला.
 
या घटनेनंतर कुटुंबीय रुग्णालय प्रशासनावर संतापले आहेत. रुग्ण सागर रेणुसे (वय 30) यांचा उंदीर चावल्याने मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे ससून रुग्णालयाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
उंदीर चावल्याने सागरचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. जोपर्यंत दोषींवर योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. ससून रुग्णालय प्रशासनावर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, रुग्णालयाने हा दावा फेटाळून लावला आहे.
 
सागरच्या मृत्यूनंतर कुटुंबीय संतप्त झाले आहेत. मात्र डॉक्टरांनी हा आरोप फेटाळून लावला असून तरुणाचा मृत्यू उंदीर चावल्याने झाला नसल्याचे म्हटले आहे. मात्र, रुग्णाच्या शरीराला उंदराने चावा घेतल्याचे डॉक्टरांनी मान्य केले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मृत सागर रेणुसे यांना काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.
 
15 मार्च रोजी दुचाकीवरून जात असताना सागरचा अपघात झाला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. शस्त्रक्रिया करूनही सागरच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती