आपल्या निर्मत्सर स्वभावाने, नेहमी आपल्या समोर येणाऱ्या सत्कार्याला आपल्या परीने हातभार लावण्यान देवपण अंगी येत असते.
आपल्या अवगुणाची आठवण आपल्या हदयास तरवारीप्रमाणे बोचत ठेवून, ती साफ (कारणासह नाहीशी ) करण्याकरिता अंतरंगात पश्चातापाच्या उर्मि उत्पन्न करण्याने देवपण अंगी येत असते. जी गोष्ट आपल्या सद्सदविवेकाला आवडली आहे ती साधण्याकरिता, विचाराइतकेच पायही धडाडीने पुढे टाकल्याने देवपण अंगी येत अअसते. माझे सर्व करणे-धरणे माझ्या दैहिक स्वार्थाकरिता नसून ते सर्व देवाच्या इच्छेकरिता आहे; आणि त्यांत न्यायीपणाने वागणे माझे कर्तव्य आहे असे वृत्तीशी निश्चित केल्याने देवपण अंगी येत असते.
कोणता देव मोठा व कोणता धर्म मोठा या वादविवादात आपली बुद्धी मलीन करीत न बसता, जी गोष्ट ग्राह्य व जे तत्व अमर आहे ते जिथे जिथे असेल तिथे तिथे सर्व महत्वाचेच आहे,असे समजून वागल्याने देवपण अंगी येत असते. आपल्या सत्य मार्गात आड येणाऱ्या कोणत्याही आपत्तीला वा मृत्यूला सहनशीलतेच्या दृष्टीने पाहून योजक वृत्तीने असणे, याने देवपण अंगी येत असते. आपले सर्व भाव आपल्या अमर आत्म्यांशी नेहमीचे तदाकार असून जग हे त्याचे किरण आहे. अनुभवल्यानेच देवपण अंगी येत असते.