दंगलीत महाराष्ट्र देशात अव्वल; "ही" धक्कादायक आकडेवारी आली समोर

मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (08:00 IST)
मुंबई : मागील काही दिवसांत महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणांनी दंगली घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, आता याबाबत आणखी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
दंगलीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याची आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने  जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, 2022 मध्ये महाराष्ट्रात दंगलींचे तब्बल 8 हजार 218 गुन्हे दाखल झाले आहेत.
 
हत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी असून, 'पोक्सो'च्या गुन्ह्यांमध्येही राज्यात वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.  देशात 2022 मध्ये सर्वाधिक दंगलीचे गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत. तर, दंगलीच्या घटनांमध्ये महाराष्ट्रापाठोपाठ बिहार, उत्तर प्रदेशचा देखील नंबर लागतो.
 
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये महाराष्ट्रात 8 हजार 218 दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यात, राज्यातील 9 हजार 558 नागरिक दंगलीमुळे प्रभावित झाले.
 
तर, दुसऱ्या क्रमांकावर बिहार असून, गेल्यावर्षी बिहारमध्ये 4 हजार 736 दंगलीचे गुन्हे दाखल झाले. सोबतच उत्तर प्रदेशमध्ये 4 हजार 478 दंगलीचे गुन्हे दाखल असून, उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे.  त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती