नवणीत राणा आणि रवी राणा यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. कोर्टाने त्यांना काल सशर्त जामीन दिल्यानंतर आज त्यांच्या जामीनाची ऑर्डर भायखळा आणि तळोजा तुरुंगात पोहोचली. त्यानंतर आधी नवणीत राणांची आणि नंतर रवी राणा (Ravi Rana) यांची देखील काही वेळात सुटका होईल. मात्र आता राणा दाम्पत्याच्या खार येथील घराच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महानगरपालिकेची टीम (BMC Team) कारवाई करण्याची शक्यता आहे. मनपाचं पथक आज सकाळीच त्यांच्या अपार्टमेंटच्या परिसरात दाखल झालं होतं. मात्र घरी कोणीही नसल्याने पथक परतलं होतं. त्यामुळे आज राणा दाम्पत्य घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या घराची पाहणी करण्यासाठी जाण्याची शक्यता आहे.
"अल्टिमेटमची भाषा कुणीही करू नये"
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट धरत राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर झालेल्या मोठ्या गोंधळानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली होती. खार पोलीस स्टेशन पोलिसांनी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयात राणा दाम्पत्याचा लढा सुरु होता. अखेर काल त्यांना जामीन मिळाला आहे.