तरुणीच्या घरचे लग्न करण्यास परवानगी देत नसल्यामुळे संतापलेल्या तरुणाने गंभीर पाऊल उचललं आणि त्यानं रागाच्या भरात तरुणीला भररस्त्यात गाठून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल. आरोपी तरुण धारदार चाकूने तरुणीवर सपासप वार करणार तेवढ्यात पोलीस कर्मचारी मयूर पाटील यांनी त्या माथेफिरू तरुणाला वेळीच अटकाव केला आणि तरुणीचे प्राण वाचवले. मात्र यावेळी आरोपी तरुणाने केलेला एक वार पाटील यांच्या हातावर झाला आणि या हल्ल्यात ते जखमी झाले.
काही सेकंदांत घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पीडित तरुणी कामावर जाण्यासाठी शिवडीच्या बरकत अली नाका येथे पायी जात असताना 31 वर्षीय अनिल बाबर हा तिच्या पाठीमागून आला आणि तरुणीला रस्ता क्रॉस करत असताना त्याने चाकूने तिच्या पाठीवर वार केला. त्यावेळी तेथे तैनात असलेले वडाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी मयूर पाटील यांनी तात्काळ धाव घेत आरोपीला अनिलला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने पाटील यांच्या हातावर सुद्धा वार केला. पण पोलिसांनी हिंमतीने आरोपीला रोखून तरुणीचे प्राण वाचवले.