राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्यानिमित्त सभा, यंदा कुठली भूमिका मांडणार?

बुधवार, 22 मार्च 2023 (16:33 IST)
राज ठाकरे यांची आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवर गुढी पाडव्यानिमित्त सभा होणार आहे.
 
2020च्या जानेवारीमध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या स्थापनेच्या तब्बल 13 वर्षांनंतर पहिल्यांदा पक्षाचं अधिवेशन घेतलं. त्यावेळी त्यांनी पक्षाचा नवा झेंडा जारी करत राजकीय भूमिकासुद्धा बदलली.
 
2020 नंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि तेव्हापासून गुढी पाडव्याच्या सभेची परंपरा सुरू केली.
 
2006ला पक्षाची स्थापना केल्यानंतर सेक्युलर भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांनी पुढच्या 12 वर्षांमध्ये अनेक भूमिका घेतल्या. कधी त्या त्यांच्या राजकीय छबीला साजेशा होत्या तर कधी त्या विपरीत होत्या. पण आता मात्र गेल्या 3 वर्षांपासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेला घातलेला हात कायम आहे.
 
मधल्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मशिदींवरच्या भोंग्यांना राज ठाकरे यांनी तीव्र विरोध केला होता. राज्यातल्या सत्ताबदलानंतर मात्र त्यांची ही भूमिका काहीशी क्षीण झालेली दिसून येतेय.
 
शिवाय गेल्या काही दिवसांमध्ये भाजपबरोबर राज ठाकरे यांनी जवळीक वाढलेली दिसून येत आहे. दिवाळीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतरच्या दिपोत्सवात तिन्ही नेते एकत्र दिसून आले होते.
 
मधल्या काळात राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या नेत्यांमध्ये वाढलेली जवळीक, तसंच राज्यात झालेलं सत्तांतर, आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती