महाराष्ट्र सरकारने ''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना'' या योजनेची व्याप्ती वाढवून 2.5कोटी महिलांचा सहभाग करण्याची घोषणा केली आहे. योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात 1.7कोटी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहे. दरम्यान, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत अनेक फसवणूकही उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना'' या योजनेअंतर्गत पनवेलच्या तहसीलदार कार्यालयाला खारघर येथील एका महिलेचे आधार कार्ड अनधिकृतपणे वापरल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली.
प्राथमिक तपासात सातारा जिल्ह्यातील एका महिलेचे नाव समोर आले. त्यानंतर लगेचच सातारा जिल्हा प्रशासनाने लाडकी बहीण योजनेंतर्गत संबंधित महिलेची माहिती घेतली. खटाव तालुक्यातील मायणी येथील रहिवासी असलेल्या एका दाम्पत्याने एकाच महिलेच्या नावाने अनधिकृतपणे 28 अर्ज भरल्याचे उघड झाले.
अधिकाऱ्यांच्या माहितीवरून वडूज पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. पोलिस या दोघांची चौकशी करत आहे.