मुंबई मनपाच्या शाळा भारीच! अवघ्या १५ दिवसात आले तब्बल ३५ हजार अर्ज

गुरूवार, 12 मे 2022 (07:40 IST)
सुरक्षित शाळा हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार असून वाढते शहरीकरण आणि रहदारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षितपणे जाता-येता यावे या उद्देशाने मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व देखील समजावून सांगितले जाणार असल्याचे ते म्हणाले.
 
ठाकरे म्हणाले, सुरक्षित शाळा उपक्रमांतर्गत शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची मानसिक आरोग्य, मौखिक आरोग्य, मधुमेह आदींची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. राज्य आणि देशाची प्रगती करणे आवश्यक असेल तर शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, याच उद्देशाने मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सध्या आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जात असून एसएससी प्रमाणेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाची शिक्षण सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय बोर्डाची शिक्षण पद्धती देखील सुरू करण्यात येणार आहे. मागील वर्षी मनपाच्या शाळांमधील चार हजार जागांसाठी दहा हजार अर्ज प्राप्त झाले होते, यावर्षी देखील केवळ 15 दिवसांत 35 हजार अर्ज प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती होत असे. आता हे चित्र बदलले असून केवळ ‘राईट टू एज्युकेशन’ नव्हे तर ‘राईट टू कॉलिटी अँड सेफ एज्युकेशन’वर भर दिला जात असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा शाळेवर आणि शाळेतील शिक्षकांवर विश्वास असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच शाळेतील पायाभूत सोयी-सुविधा आणि अन्य उपक्रम राबविण्याला प्राधान्य दिले जात आहेत. मुंबई मनपाच्या शाळांमधून शिक्षण आणि अन्य उपक्रमांसाठी शिक्षकांबरोबरच सामाजिक संस्थांचाही मोठा सहभाग लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईत‍ टॅक्टिकल अर्बनिझम अंतर्गत रस्त्यांवरील सुरक्षिततेला महत्त्व दिले जात आहे, याचाही विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत लवकरच वाघोबा क्लब, ॲस्ट्रॉनॉमी क्लब सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना दर्जेदार अन्न पुरविण्यासाठी अक्षय पात्र, अक्षय चैतन्य यांचा सहभाग घेतला जात असल्याचे ते म्हणाले. यापुढे सुरक्षित रूग्णालये तसेच सुरक्षित धार्मिक स्थळे हे उपक्रम राबवायचे असून ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ हा उपक्रम राज्यात सर्वत्र सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शाळांमधून जीवनाला आकार देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये आता सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमाची भर पडत आहे. सर्वच महानगरपालिकांमधून शैक्षणिक बाबींसाठी निधी खर्च होतो, त्याअंतर्गत शैक्षणिक उपक्रमांसह क्रीडा, आरोग्य, रस्ते सुरक्षा, पायाभूत सोयी-सुविधा, तंत्रज्ञानाचा अंगिकार, दर्जेदार अन्नपुरवठा आदी माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सुरक्षित शाळा प्रवेश हा स्तुत्य उपक्रम असून यापुढे राज्यात सर्व महानगरपालिकांच्या शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल, असे त्यांनी सांगितले.
 
शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड म्हणाल्या, माझ्या शैक्षणिक जीवनाची सुरूवात महानगरपालिकेच्या शाळांमधूनच झाली असल्याने या शाळांविषयी जिव्हाळा आहे. या शाळा उत्कृष्टतेचे केंद्र बनण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सध्या राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांमुळे शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढत असून शाळांमधून आपल्याला केवळ विद्यार्थी नव्हे तर जबाबदार नागरिक घडवायचा असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील शाळांबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या सुमारे 66 हजार शाळा आहेत. या शाळा टप्प्याटप्प्याने आदर्श शाळा घडविल्या जात आहेत. पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पहिले पाऊल’ उपक्रम राबविला जात आहे. त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. प्राथमिक शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने द्वैभाषिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. पर्यावरणाचे महत्त्व समजण्यासाठी पर्यावरणविषयक अभ्यासक्रमही सुरू केला जात आहे. राज्यात शाळांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून पाच टक्के निधी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त अन्य माध्यमातूनही निधी उपलब्ध होत असून सर्वांनी एकत्र येऊन राज्यातील सर्वच शाळांचा शैक्षणिक दर्जा जागतिक स्तराचा बनवूया, असे आवाहन त्यांनी केले.
 
मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शाळेला महत्त्वाचे स्थान आहे. महानगरपालिकेच्या शाळा आणि शिक्षक विद्यार्थ्यांसाठी पालकांची भूमिका बजावत आहेत. मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निधी खर्च केला जात आहे. दर्जेदार शिक्षणामध्ये या शाळा अव्वल असून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कपडे, अन्नपदार्थ आदी बाबीही पुरविल्या जात आहेत. पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार प्राधान्याने केला जात आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता देखील महत्त्वाची असून त्यासाठी सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 
महानगरपालिकेचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी प्रास्ताविकाद्वारे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची यावेळी माहिती दिली. यावर्षी शाळा प्रवेशासाठी पहिल्या 15 दिवसांत 35 हजार अर्ज प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात 200 शाळांमधून सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रम राबविण्यात येत असून यासाठी डब्ल्युआरआय या संस्थेचे सहकार्य घेण्यात येत आहे. यामध्ये मुंबई शहरातील 83 तर उपनगरातील 117 शाळांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती