तौक्ते चक्रीवादळ : मुंबईजवळ समुद्रात 400 जण अडकले, नौदलाची जहाजं रवाना

सोमवार, 17 मे 2021 (16:54 IST)
बॅाम्बे हाय तेलक्षेत्राजवळ बार्जवर 273 जण अडकले आहेत, तर आणखी एका बार्जवर 137 जण अडकले आहेत. अरबी समुद्रात चक्रीवादळ असल्यानं भीती व्यक्त करण्यात येतेय.
 
अडकलेल्यांच्या सुटकेसाठी नौदलाच्या INS कोची आणि INS कोलकाता या युद्धनौका रवाना झाल्या आहेत. तसंच, INS तलवार सुद्धा बचावासाठी रवाना झालीय.
 
बॉम्बे हाय हे तेलक्षेत्र मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापासून 176 किलोमीटर आत समुद्रात आहे. याच भागातून तौक्ते चक्रीवादळही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे बचावाचं ऑपरेशन मोठं असेल असं म्हटलं जातंय.
मुंबईत पुढचे काही तास मुसळधार पाऊस - IMD
मुंबईत पुढचे काही तास मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभाग अर्थात IMD ने दिला आहे. त्याचसोबत, पावसासोबत जोराचा वाराही असेल, असं IMD नं म्हटलंय.
तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून पुढील काही तासांसाठी चक्रीवादळाचं केंद्र हे मुंबईपासून 160 किलोमीटरच्या आसपास समुद्रात आहे.
 
या वादळाच्या प्रभावामुळे रायगड, पालघर, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरीमध्ये वेगवान वारे वाहत आहेत. मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे.
तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आला आहे.
 
सोमवारी 17 मे रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आला होता. आता ही वेळ वाढविण्यात आली असून 6 वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आलाय.
 
मुंबईत अनेक ठिकाणी पाणीही साचलं आहे. परिणामी वांद्रे-वरळी सीलिंक पुढची सूचना मिळेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
वादळाच्या प्रभावामुळे मुंबई आणि परिसरात पाऊस पडत आहे.
 
मुंबईतील जोगेश्वरी परिसरात वेगवान वाऱ्यामुळे झाड पडलं आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
घराबाहेर असलेल्या मोकळ्या वस्तू अन्यत्र ठिकाणी हलवा.
महत्त्वाचे दस्ताऐवज प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा.
बँटरीवर चालणाऱ्या आणि राखीव पॉवरच्या यंत्रांची नियमित परीक्षण करा.
दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या बातम्यांकडे, सूचनांकडे लक्ष ठेवा.
आपात्कालीन उपयोगी वस्तूंची किट बॅग तयार ठेवा.
मोठं छप्पर असलेल्या जागा टाळा. डोकं आणि मानेच्या संरक्षणासाठी हातांचा उपयोग करा.
विद्युत उपकरणं तपासा.
पिण्याचे पाणी स्वच्छ ठिकाणी साठवून ठेवा.
गुजरातच्या दिशेने प्रवास
तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (17 मे) पहाटे तौक्ते दीवपासून 260 किलोमीटर अंतरावर होतं. तौक्ते मंगळवारी (18 मे) गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितलं की, चक्रीवादळामुळे 17 आणि 18 मे रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकताना हवेचा वेग प्रतितास 145 किलोमीटर ते 155-165 किलोमीटर राहील, अशी शक्यता आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन जुनागढमधील किनारपट्टीच्या मलिया भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं. जिल्हाधिकारी सौरभ पारधी यांनी सांगितलं, "1200 लोकांना हलविण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टिनं सर्व काळजी घेण्यात आली असून अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे."
 
चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेऊन मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा फटका बसण्याची शक्यता असलेल्या किनारपट्टीवरील राज्यांमध्ये एनडीआरएफची 101 पथकं पाठविण्यात आली आहेत.
तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना बसला आहे. तौक्तेमुळे रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत, तर सिंधुदुर्गात 100 हून अधिक घरांचं नुकसान झालंय.
 
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या आतापर्यंत 5 हजार 942 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती