सोमवारी दुपार पर्यंत चक्रिवादळ मुंबईच्या अक्षांशावर येण्याची शक्यता

सोमवार, 17 मे 2021 (07:37 IST)
अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रिवादळाचा कोकण किनारपट्टीला धोक असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  त्याचबरोबर मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, गुहागर,दापोली,मंडणगड या तालुक्यांना चक्रिवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे या भागात सुरक्षिततेसाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मुंबईतही चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.
 
अरबी समुद्रात सध्या तोक्ते चक्रिवादळाची अतितीव्र परिस्थिती आहे. वाऱ्याचा वेग हा १५० किलोमीटरपेक्षा जास्त असू शकतो. त्याचप्रमाणे हे चक्रिवादळ गुजरातच्या दिशेने जात असताना समुद्र किनाऱ्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. परंतु  चक्रिवादळाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकरण यांनी दिली आहे.
 
तोक्ते चक्रिवादळ सध्या मुंबईपासून ४०० हून अधिक किलोमीटरवर आहे. सोमवारी दुपार पर्यंत हे चक्रिवादळ मुंबईच्या अक्षांशावर येण्याची शक्यता आहे. मुंबईपासून २०० किलोमीटर दूर असेल. मुंबईच्या किनारपट्टीच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि खवळलेला समुद्र अशी परिस्थिती असेल असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती