मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा,रेड अलर्ट जारी

शनिवार, 4 जुलै 2020 (09:32 IST)
आज सकाळपासूनच पावसाने चांगला जोर धरला असून मुंबई आणि उपनगरांना झोडपून काढलं आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्यानं शनिवारीही मुंबई शहर आणि उपनगरातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा दिला असून सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांनी समुद्रात ४.४ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार शनिवारी मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतही रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय नाशिक, पुणे येथे घाट विभागांमध्येही रेड अॅलर्ट आहे. सध्या गुजरात आणि जवळच्या परिसरामध्ये चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच निसर्ग चक्रीवादाळामुळे महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी झाली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने सुरुवातीपासूनच जोर धरला होता, मात्र मुंबईसह अनेक शहरांत जून महिना कोरडाच गेला. त्यामुळे मुंबईत कालपासून बरसणारा हा पाऊस शनिवारीही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच, मुंबई महानगरपालिकेनंही २४ विभाग कार्यालयातील सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई पालिकेने काय घेतली खबरदारी?
मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व पर्यायी बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले असून त्यानुसार नियोजनात्मक अंमलबजावणी करण्यात आली आहे.
आणीबाणी मदत यंत्रणांपैकी मुंबई पोलीस दल, महापालिकेचे मुंबई अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, पर्जन्य जलवाहिन्या यासारख्या विविध यंत्रणाचे समन्वय अधिकारी, मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत.
मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यकतेनुसार क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था ‘एल’ विभागाच्या ‘एल’ विभागा मार्फत करण्यात येणार आहे.
यापूर्वीच निर्धारीत करण्यात आल्यानुसार महापालिकेच्या २४ विभागांमधील तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या मनपा शाळा त्वरीत मदतीकरिता सुसज्ज आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती