मुंबईतील बीआयटी चाळी 100 वर्षापेक्षा जुन्या आहेत. या चाळीच्या पुनर्विकासासाठी रहिवाशी विकासकामार्फत मुंबई महानगरपालिकेकडे प्रस्ताव पाठवित आहेत. या संदर्भात सर्वसमावेशक निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
मुंबईतील बी.आय.टी. चाळीची निर्मिती होऊन जवळपास १०० वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे अशा चाळींचा पुनर्विकास हा विकास नियंत्रण नियमावली १९९१ अन्वये करण्यात येत आहे. बी.आय.टी. चाळीतील रहिवाशांमार्फत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन संस्थेमार्फत विकासकाची नेमणूक करण्यात येते. तद्नंतर विकासकामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेस पुनर्विकास प्रस्ताव सादर करण्यात येतो, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत २२ वसाहतीमध्ये १३३ बी.आय.टी. इमारती आहेत, त्यापैकी ६१ इमारतींमध्ये महानगरपालिका भाडेकरुंच्या गृहनिर्माण संस्थांमार्फत नेमणूक केलेल्या विकासकांकडून पुनर्विकास प्रस्ताव महानगरपालिकेस प्राप्त झाले आहेत. सदर ६१ इमारतींपैकी १७ इमारतींचा पुनर्विकास झाला असून ४४ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित ७२ इमारतींचे संरचनात्मक परिक्षण करुन महानगरपालिकेमार्फत नियमितपणे दुरुस्ती करण्यात येते. सद्य:स्थितीत १२ इमारतींच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत सुरु असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.