“कर्नाटक सरकारचे कायदामंत्री माधूस्वामी यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करावी अशी मागणी त्यांच्या विधिमंडळात केली. तसेच मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक राहतात असा जावईशोधही लावला. कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य लक्ष्मण सौदी यांनी तर मुंबई ही कर्नाटकचीच आहे असा दावा करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय,” असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
अजित पवार पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात कन्नड माणसं नाहीत का? तर महाराष्ट्रात संपूर्ण भारतातील विविध प्रांतातील लोक अतिशय गुण्यागोविंदाने राहतात. याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आपण सर्वांना एकोप्याने घेतो. सीमाप्रश्नाला अशाप्रकारे चुकीचं वळण देण्याचं आणि सीमावासीयांच्या भावना दुखावण्याचं काम कर्नाटक सरकार करत आहे.”
“माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, त्यांनी या दोन्ही वक्तव्यांचा तीव्र शब्दात निषेध करावा. कर्नाटक सरकार वारंवार असे वक्तव्य करत आहे. तसेच कर्नाटक असं वारंवार करत आहे हे केंद्र सरकारपर्यंत पोहचवावं. कारण स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेऊन काही गोष्टी ठरवल्या होत्या,” असं अजित पवारांनी सांगितलं.